मॅनेजमेंट कौन्सिलमधील दोन जागा सुटा लढविणार
schedule29 Mar 25 person by visibility 120 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील रिक्त दोन जागेसाठी सध्या निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या दोन जागा शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) लढविणार आहे. निवडणूक लढविण्यासंबंधी संघटनात्मक पातळीवर प्राथमिक चर्चा झाली आहे.
दोन जाग रिक्त झाल्यामुळे त्या भरण्यासाठी सध्या कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिवाजी विद्यापीठाकडून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. एक एप्रिलला अर्जांची छाननी तर चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. ११ एप्रिल २०२५ रोजी अॅकेडमिक कौन्सिलची बैठक आहे. त्या बैठकीत निवडणूक प्रक्रिया होणार आहे. दोन रिक्त जागासाठी विद्यापीठ विकास आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. डॉ. मंजिरी मोरे, डॉ. एस. पी. हंगेरगीकर, डॉ. मनिष भाटिया यांनी विकास आघाडीकडे मुलाखती दिल्या आहेत.
दुसरीकडे प्राध्यापकांची संघटना अशी ओळख असलेल्या शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ अर्थात सुटानेही मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी सुटाचे अध्यक्ष प्रा. आर. के. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. चव्हाण म्हणाले, ‘मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन रिक्त् जागेसाठी निवडणूक लढविण्यासंबंधी संघटनात्मक पातळीवर प्राथमिक चर्चा झाली आहे. उमेदवार कोण अद्याप ठरलेले नाही. मात्र संघटना निवडणूक लढविणार आहे. रविवारी (३० एप्रिल) सुटाचे उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.’