Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!शिक्षक बँकेची सभा गोंधळाची, हमरीतुमरी -अंगावर धावून जाण्याचा प्रकार ! संचालकांची संख्या १७ वरुन २१ करण्याचा ठराव मंजूर !!गडहिंग्लजमध्ये मुख्याध्यापक संघाची नव्याने इमारत उभारणार, मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णयठरावधारकांच्या व्हेरिफिकेशनवरून भाजप- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये जोरदार वादावादी, मंत्र्यांची धावाधावमहायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेना, नेते मंडळांची पुन्हा बैठक सुरूशिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा कोल्हापुरात उत्साहात शुभारंभशिक्षक बँकेला तीन कोटीहून अधिक नफा, आठ टक्के लाभांश ! व्यवसाय वृद्धीसाठी संचालक संख्या वाढीचा प्रस्ताव ! !सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जाहिरात

 

महायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!

schedule27 Sep 26 person by visibility 30 categoryउद्योग

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : निवडणूक एकत्र लढायचे ठरले, पण कोणाला किती जागा, मोठा भाऊ कोण यावरुन महायुतीमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. अधिकाधिक ठराव गोळा करताना आता एकमेकांच्या ठरावधारकांवर हक्क सांगण्याचा प्रकार सुरू झाला. काही ठरावधारकही भलतेच हुशार. त्यांनीही साऱ्यांची मर्जी राखण्यासाठी अनेकांना ठराव दिले. यामुळे पक्षीय पातळीवर निर्माण झालेला संशयकल्लोळ दूर करण्यासाठी ठरावांचे व्हेरिफिकेशन करण्याचे ठरले. मात्र या ठरावाच्या व्हेरिफिकेशनवरुन  रविवारी, २७ सप्टेंबर २०२६ रोजी महायुतीमध्ये हायहोल्टेज ड्रामा झाला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच भारतीय जनता पक्ष आणि  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे एकमेकांच्या दिशेने धावले. वादावादीच्या घटनेवर मंत्री पाटील हे चांगलेच संतापले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

ठरावधारकांच्या व्हेरिफिकेशनवरुन निर्माण झालेला संशयकल्लोळ, पदाधिकाऱ्यातील वादावादी यामुळे महायुतीतील परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी महायुतीच्या नेतेमंडळींनी हॉटेल पॅव्हेलियन येथे धाव घेतली. मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम ही सारी मंडळी एकवटली. त्या नेतेमंडळीत बंद खोलीत चर्चा झाली. साधारणपणे साडेपाच वाजता पुन्हा एकदा तालुकानिहाय ठरावधारकांची पडताळणी सुरू झाली. भुदरगड, करवीर, पन्हाळा, गडहिंग्लज यासह पाच तालुक्यातील ठरावांची पडताळणी होत आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत पडताळणीचे काम सुरू होते. तालुकानिहाय पडताळणी करत असताना समोर नेता, गोकुळचे माजी संचालक आणि त्या मागे ठरावांच यादी घेऊन धावपळ करणारा कार्यकर्ता असे चित्र होते.

ठरावावरुन महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीकडे १५०० हून अधिक ठराव तर शिवसेनेकडे १३०० हून अधिक ठराव असल्याचे नेत्यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेत्यांनीही आपल्याकडील ठरावांची संख्या १४०० पेक्षा जास्त असल्याचा दावा केला आहे. ज्याकडे जादा ठराव त्याना जास्त जागा असे सूत्र जागा वाटपावेळी वापरले जाणार आहे. महायुतीमध्ये काही मंडळी ठराव संख्येवरुन जागा वाटपावर ठाम आहेत. तर काही जण पक्षीय पातळीवर जागा वाटप व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत.

रविवारी, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशनसाठी बैठक बोलावली होती. भाजप कार्यालयात मंत्री पाटील, खासदार महाडिक, आमदार महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, रवींद्र माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे माजी संचालक शौमिका महाडिक, चेतन नरके, अंबरिश घाटगे, धैर्यशील देसाई, प्रताप पाटील यांच्यासह भाजपचे इच्छुक उमेदवार होते. गडहिंग्लजमधील ठरावावरुन भाजप पडताळणी करत असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी सतीश पाटील, विकास पाटील त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी, ते ठराव राष्ट्रवादीचे आहेत असा दावा केला. त्या ठरावांची पुन्हा व्हेरिफिकेशन करण्याची मागणी केली आणि वादाला तोंड फुटले. ठरावांच्या व्हेरिफिकेशनची मागणीचा अधिकार तुम्हाला कोणी दिला यावरुन वाद वाढत गेला…एकेरी भाषेपर्यंत पोहोचला. मंत्री पाटील यांनी या साऱ्या प्रकारावरुन दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. हा प्रकार मंत्री मुश्रीफ यांना कळाल्यानंतर ते ही भाजप कार्यालयात पोहोचले. नेतेमंडळीची बैठक झाली, पुन्हा साऱ्या गाडयांचा ताफा पॅव्हेलियनकडे वळला. एकापाठोपाठ एक महायुतीतील नेते दाखल झाले. हॉटेलच्या खोलीत नेत्यांची चर्चा आणि बाहेर पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांची घालमेल असे वातावरण होते.

………………

“ तालुकानिहाय कोणाकडे ठराव किती याची पडताळणी करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. आजच्या बैठकीत कोणाचे ठराव किती यावर एकमत झाले. कोणाला किती जागा लढविता येतील यासंबंधीचा फॉर्म्युला दोन दिवसात ठरेल. जागा वाटपाचा प्राथमिक प्रस्ताव तयार झाला. ठराव संख्येवरुन जागा वाटप की एकमेकांच्या सामज्यंसाने जागा वाटप हे लवकरच स्पष्ट होईल.”

-चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes