Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक बँकेची सभा गोंधळाची, हमरीतुमरी -अंगावर धावून जाण्याचा प्रकार ! संचालकांची संख्या १७ वरुन २१ करण्याचा ठराव मंजूर !!गडहिंग्लजमध्ये मुख्याध्यापक संघाची नव्याने इमारत उभारणार, मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णयठरावधारकांच्या व्हेरिफिकेशनवरून भाजप- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये जोरदार वादावादी, मंत्र्यांची धावाधावमहायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेना, नेते मंडळांची पुन्हा बैठक सुरूशिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा कोल्हापुरात उत्साहात शुभारंभशिक्षक बँकेला तीन कोटीहून अधिक नफा, आठ टक्के लाभांश ! व्यवसाय वृद्धीसाठी संचालक संख्या वाढीचा प्रस्ताव ! !सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपशिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात आवाज देण्यासाठी माझी उमेदवारी- प्रा. सचिन सानप

जाहिरात

 

शिक्षक बँकेची सभा गोंधळाची, हमरीतुमरी -अंगावर धावून जाण्याचा प्रकार ! संचालकांची संख्या १७ वरुन २१ करण्याचा ठराव मंजूर !!

schedule27 Sep 26 person by visibility 12 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळाची परंपरा कायम राहिली. बुडीत कर्ज निधीमधील रक्कम नफ्यात दाखविणे, येणे अॅडव्हान्स, डीसीपीएस शिक्षक निधी, डाटा सेंटरवरील खर्च, नोकरभरतीचा विषय अशा विविध विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मोठयाने बोलणे, हमरीतुमरी, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकाराने सभा गाजली. सभेत माइक बंद करण्यात येत असल्याचा आरोपही विरोधकांकडून झाला. दरम्यान या सभेत शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाच्या संख्येत वाढ करण्याचा पोटनियम मंजूर करण्यात आला. शिक्षक बँकेची संख्या आता १७ वरुन २१ वर पोहोचली. बँकेचे चेअरमन बाबुराव परीट हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

सभेत विरोधकांनी, दोन अंकी लाभांश व कर्जावरील व्याज दर एक अंकी करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या घोषणेवरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर चेअरमन परीट यांनी, ‘दोन अंकी लाभांश आणि कर्जावरील व्याज दर एक अंकी नक्की करू.’अशी ग्वाही सभेत दिली. तसेच बँकेला अहवाल वर्षात तीन कोटी सहा लाख रुपये नफा झाल्याचे सांगितले.बँकेच्या ठेवी ४३८ कोटी तर कर्ज वितरण २९६ कोटी रुपयांपर्यत झाले आहे. बँकेच्या व्यवसाय वृद्धीसाठी संचालक मंडळाची संख्या वाढविण्याची भूमिका आहे.’असे त्यांनी स्पष्ट केले.

 संचालक संख्या वाढीचा ठराव सभेच्या शेवटच्या मिनिटाला मंजूर करुन घेतला. विविध विषयावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी समर्थक सभासद आणि विरोधी सभासद अनेकदा आमनेसामने आले.जोरदार वादावादीचे प्रसंग घडले.  दरम्यान सभेच्या आदल्यादिवशीच सत्ताधारी व विरोधकांनी पत्रकार परिषद घेत बँकेच्या कामकाजावरुन एकमेकांवर निशाणा साधला होता. बीडीडीआरमधून साठ लाख रुपये रक्कम नफ्यात दाखविण्यात आली आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. बँकेचे माजी चेअरमन संभाजी बापट, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, माजी संचालक प्रसाद पाटील, सर्जेराव सुतार, मारुती दिंडे यांनी बीडीडीआरमधील साठ लाख रुपये नफ्यात दाखविल्यामुळे बँकेस प्रत्यक्षात दोन कोटी ४६ लाख रुपयांचा नफा झाला आहे, मात्र सत्ताधाऱ्यांनी नफा तीन कोटी सहा लाख दाखवित सभासदांची दिशाभूल केली आहे.’असा आरोप केला. मात्र अध्यक्ष परीट यांनी सभासदांचा बँकेवर विश्वास वाढत आहे. ठेवीच्या रकमेत वाढ होत असल्याचे सांगत विरोधकांचा आरोप फेटाळला. विरोधकांनी नोकरभरतीचा विषय उपस्थित करताच चेअरमन परीट यांनी, ‘नोकर भरतीध्ये तीन अंकी आकडा गाठणार नाही’अशी हमी जी दिली होती, त्याच्याशी आजही आम्ही ठाम आहोत असे स्पष्ट केले.

श्रीकांत चव्हाण यांनी संचालकांची संख्या वाढल्याने बँकेला काय फायदा होणार ? मुळात सभासद संख्या कमी होत आहे, ? कर्ज वाटपात घट होत आहे अशा स्थितीत संचालक संख्या वाढीतून काय साध्य करणार आहात ? असा थेट सवाल केला. त्यावर सत्ताधारी समर्थक सभासदाने, जिल्हा परिषद सोसायटीत २५ संचालक कसे चालतात असा सवाल केला. सत्ताधारी समर्थकांच्या त्या विधानावर चव्हाण यांनी आक्षेप घेत शिक्षक बँक व जिल्हा परिषद सोसायटी या दोन संस्था वेगळया आहेत. शिक्षक बँकेच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांनी बोलावे असे सुचविले. श्वेता खांडेकर यांनी डीसीपीस धारकांचा विषय उपस्थित करताना विद्यमान संचालकांनी संबंधित वर्गाची फसगत केली असा आरोप केला. मागील संचालक मंडळाने डीसीपीएसधारक मयत शिक्षकाच्या वारसांना पाच लाखाचे अर्थसाहाय करत असे, विद्यमान संचालकांनी २५ लाखाची घोषणा केली होती. केवळ सहा लाख रुपये देतात असे सांगत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

सभेतील चर्चेत ‘शिक्षक बँकेच्या संचालक मंडळात पन्न्नास टक्के महिला असाव्यात’अशी मागणी केली. मनोहर रणदिवे यांनी वार्षिक अहवालातील २२ पाने मराठी भाषेतही प्रसिद्ध् करावी अशी सूचना झाली.तसेच ‘शिक्षक बँकेच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची बँकेत दोन लाखाच्या ठेवी असायला हव्यात आणि त्यांनी किमान पाच लाख रुपयांचे कर्ज उचलले असावे’ असा नियम करा अशी सूचना केली. दुपारी एक वाजता सुरू झालेली सभा चार वाजेपर्यंत चालली. बँकेचे चेअरमन परीट यांनी, ‘सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकार उत्तर देऊ शकलो याचा आनंद आहे. सभासदांना न्याय देण्याची भूमिका सत्ताधारी संचालक मंडळाची आहे.  जी जी आश्वासने सभासदांना दिले आहेत त्या साऱ्यांची पूर्तता केली जाईल 'प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes