सुनीलकुमार लवटे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे -पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार
schedule24 Jul 25 person by visibility 179 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : प्रवरा सामाजिक मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे - पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यासह अन्य पुरस्कारांची घोषणा डॉ. रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पुरस्काराचे यंदाचे ३५ वे वर्ष आहे. आठ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण समारंभ आहे. डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण होणार आहे. सहकारी साखर कारखानदारीचे जनक व सहकार चळवळीचे अध्वर्यू पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह) तर कोल्हापूरच्या डॉ. एच.व्ही. देशपांडे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार (२५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह) मिळाला आहे.
संगमनेर येथील संतोष भालेराव यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार (दहा हजार रुपये व स्मृतिचिन्ह), सातारा येथील दिलीप जगताप यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार (२५ हजार रुपये व स्मृतचिन्ह) जाहीर झाला. सांगली येथील अतांबर शिरढोणकर व निफाड येथील प्रसाद अंतरवेलीकर यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारांनी (२५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह)सन्मानित करण्यात येणार आहे.
यासोबतच संदीप तपासे यांच्या काठावरची माणसे या कथाहसंग्रहाला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सहकाराचा कल्पवृक्ष : विठ्ठलराव विखे पाटील’ हे पुस्तक प्रकाशित करणारे डॉ. वसंतराव ठोंबरे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे समितीचे निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगितले.