जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियान राबविणार - कार्तिकेयन एस
schedule03 Jul 24 person by visibility 548 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात डायरिया या आजाराचे प्रमाण वाढू नये म्हणून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी एक जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अतिसार थांबवा ( स्टॉप डायरिया ) हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली.
या अभियानाचा जिल्हास्तरावर शुभारंभ बुधवारी, तीन जुलै रोजी झाला. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या गावात पाणी व स्वच्छतेमध्ये शाश्वता ठेवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे सीईओंनी केले. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तपासणी एफटीकेद्वारे (पाणी तपासणी संच) करण्यात येणार आहे. यामध्ये दुषित पाणी आढळले तर ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर या अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येऊन ग्रामपंचायत व इतर सरकारी यंत्रणा, सर्व विभाग या अभियानात सहभाग घेऊन आठवडानिहाय नियोजन आहे.
या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर बॅनर्स लावली जातील. पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे. घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा या अभियानामध्ये सहभाग घेणेत येणार आहे.
अभियान शुभारंभप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट, महिला व बाल कल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वैजनाथ कराड उपस्थित होते.