मंगळवारी ऑल टाइम्स हिटस कार्यक्रम ! रंगणार तालासुरांची जुगलबंदी !!
schedule08 Dec 25 person by visibility 22 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुंबई येथील प्रसिद्ध मेंडोलिन वादक प्रदीप्तो सेनगुप्ता, बासरीवादक किरण विणकर आणि पुण्याचे हार्मोनियम वादक सचिन जांभेकर यांच्या तालासुरांची जुगलबंदी मंगळवारी (९ डिसेंबर २०२५) रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या तीन प्रसिद्ध कलाकारांच्या वाद्यांची जुगलबंदीची मैफील सायंकाळी पाच वाजता गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे होणार आहे अशी माहिती संयोजक व नाकोडा म्युझिकल अॅकॅडमीचे प्रदीप राठोड, गायक नितीन सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘ऑल टाइम्स हिटस’ या नावांनी कोल्हापुरात या तीन कलाकारांचा पहिल्यांदाच एकत्रितपणे कार्यक्रम होत आहे. या कलाकारांच्या सादरीकरणातून वाद्यांचा अप्रतिम आविष्कार घडणार आहे.
प्रदीप्तो सेनगुप्ता, किरण विणकर आणि सचिन जांभेकर हे तिघेही मोठे कलाकार आहेत. सेनगुप्ता हे मूळचे कोलकत्ता येथील आहेत. १९८८ मध्ये ते मुंबईत आले. स्वर्गीय आर. डी. बर्मन यांच्या वाद्यवृंदात सहभागी झाले. संगीतकार जतीन -ललित-, आनंद – मिलिंद, नदीम – श्रवण, लक्ष्मीकांत –प्यारेलाल यांच्यासोबत काम केले आहे. विणकर हे मुंबईचे आहेत. त्यांनी आघाडीच्या सर्वच कलाकारांसोबतत काम केले आहे. गाजलेल्या मराठी, हिंदी गाण्यासाठी बासरीवादन केले आहे. हार्मोनियमवादक सचिन जांभेकर हे गेल्या ३५ वर्षापासून देश-विदेशात विविध कार्यक्रमांमध्ये वादक म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या तीन कलाकारांची अदकारी अनुभवता येणार आहे. प्रेक्षकांनी या कलाकारांच्या वाद्यांचा कलाविष्कार अनुभवण्यासाठी उपस्थित राहावे. या कार्यक्रमासाठी तिकीट विक्री सुरू आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली. कार्यक्रमासाठी हॉटेल रेडिएंटचे निखितेश पाटील यांचेही सहकार्य लाभले आहे. पत्रकार परिषदेला संजय लोंढे, शेखर आयरेकर उपस्थित होते.