ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन, संचमान्यतेतील त्रुटी दूर करा
schedule08 Dec 25 person by visibility 141 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संच मान्यतेतील त्रुटी दूर कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्यावतीने सोमवारी, आठ डिसेंबर २०२५ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे धरणे आंदोलन केले. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मारत प्रशासनाचे लक्ष वेधले.
२०२५-२६ च्या शिक्षक संघ मान्यता ऑनलाईन करण्यात येणार आहेत यामध्ये वीस वर्षा वरील विद्यार्थी ग्राह्य धरण्यात यावेत, एटीकेटी विद्यार्थी ग्राह्य धरण्यात यावेत तसेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया फक्त महानगरामध्ये राबवावी. यासह कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जाचक ठरणाऱ्या अटी रद्द कराव्या या मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना दिले. संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे यांनी आंदोलन करण्यामागील कारणमीमांसा स्पष्ट केली. प्रा. प्रशांत मेधावी यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या मांडल्या. यावेळी शाळा कृती समितीचे बाबा पाटील, डीसीपीएस संघटनेचे प्रा करणसिंह सरनोबत यांची भाषणे झाली.
संघटनेचे अध्यक्ष प्रा. अभिजित दुर्गी यांनी संघटनेची भूमिका मांडली. यावेळी संघटनेचे सचिव प्रा संजय मोरे यांनी संच मान्यतेमधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली. महासंघाचे माजी कार्याध्यक्ष प्रा अविनाश तळेकर यांनी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी वर्तमान काळातील शिक्षकांच्या समोरील समस्या व त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करून संघटनेला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी प्रा. अमर चव्हाण, प्रा. कॅ. डॉ. अमित रेडेकर, प्रा. व्ही टी कांबळे, प्रा. सुनील भोसले, प्रा. बी. के. मडीवाळ, प्रा. आर. बी. गावडे, प्रा. प्रकाश बोडके, प्रा. ऐश्वर्या पालकर, प्रा.संध्या नागन्नावर यांच्यासह ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.