महिलादिनी कोल्हापुरात महिलांचे राज्यस्तरीय महासंमेलन, रामदेवबाबा मार्गदर्शन करणार !
schedule28 Feb 25 person by visibility 523 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महिला पतजंली योग समिती, महाराष्ट्र राज्यतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च २०२५ रोजी महिलांचे राज्यस्तरीय महासंमेलन होत आहे. योगगुरू स्वामी रामदेवबाबा या महासंमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती पतजंली योग समितीच्या महिला राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, पतजंली योग समितीचे सन्मति मिरजे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. या महासंमेलनासाठी दहा हजार महिला सहभागी होतील या पद्धतीने नियोजन केले आहे.
यादिनी गांधी मैदान येथे सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी आठ ते नऊ या वेळेत कुंकुमार्चन सोहळा होणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत योगगुररू रामदेवबाबा व पतंजली योग समितीच्या साध्वी देवप्रिया यांचे ‘आरोग्य, अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच भारतीय संस्कृती, भारतीय शिक्षण पद्धती, आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग अशा विविध गोष्टीवर संबोधित करतील. कुंकूमार्चना बरोबर सांकृतिक कार्यक्रम, महिलांच्या मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा, संस्थांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महिला योग समितीच्या १०० योगशिक्षिका स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहणार आहेत. या महासंमेलनात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. हे महासंमेलन सर्वांसाठी मोफत आहे. पत्रकार परिषदेला पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा छाया पाटील, दीप्ती कदम, मंगल वैद्य,अनिल जोशी, अनिता जोशी, स्नेहल कुलकर्णी,अनुपमा गोरे,नीता राजपूत, कल्पना ठोकळ आदी उपस्थित होते.