कोल्हापुरातील ८१ प्रभागासाठी प्रत्येकी पन्नास लाखाचा निधी द्यावा ? भाजपा पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी
schedule06 Jan 25 person by visibility 35 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : . कोल्हापूर शहर परिसरात प्रत्येक प्रभागात रस्ते, ड्रेनेज, गटर्स, गार्डन सांस्कृतिक हॉल अशा विकास कामांची आवश्यकता असून महापालिकेच्या ८१ प्रभागासाठी प्रत्येकी ५० लाख असा एकूण ४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद मुख्यमंत्री म्हणून करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे यांच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. कोल्हापूर शहराला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, पन्हाळा अशा ठिकाणी भाविक व पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. मात्र शहरातील रस्त्यांची दुरावस्था अद्यापही बिकट आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य असून अनेकांना मणक्याचे आजार उद्भवू लागले आहेत. अनेक वर्षे प्रशासक असल्यामुळे बरीच कामे प्रलंबित राहिले आहेत. असे निवेदनात म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर शहराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नाही असे शिष्टमंडळाला आश्वस्थ केले.