शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवावे : सुप्टाची मागणी
schedule22 Mar 25 person by visibility 355 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवावे अशी मागणी शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेने केली आहे. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करू नये या मागणीचे निवेदन कुलगुरू डी टी शिर्के यांना दिले. सुप्टाचे अध्यक्ष डॉ. जी बी कोळेकर व सचिव डॉ. उदय पाटील यांनी हे निवेदन दिले आहे.
निवेदनांत म्हटले आहे, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय तत्कालीन धुरिणांनी प्रचंड विचारांती घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, मंत्री बाळासाहेब देसाई आदीपर्यंत सर्वानीच सखोल अभ्यास करून या विद्यापीठाला 'शिवाजी विद्यापीठ,' असे नाव दिले आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तार करण्याबाबत चर्चा आहे. काही संघटनांनी यासंदर्भात आंदोलनही केले आहे. दुसऱ्या बाजूस अनेक संघटना आणि कोल्हापूरची जनता शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करु नये, या मताची आहे. कोल्हापुरात शिवाजी पूल, शिवाजी चौक, शिवाजी पार्क, शिवाजी पेठ, शिवाजी मंदिर, शिवाजी स्टेडियम अशा अनेक वास्तू आणि ठिकाणे आहेत. यामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आदर तसूभरही कमी होत नाही. केवळ शिवाजी विद्यापीठाच्या नावाच्या संदर्भाने अकारण वाद निर्माण केला जात आहे. नामविस्तारामुळे लघुरुप प्रचलित होते व मूळ नाव बाजूस पडते असे अनेक उदाहरणावरून दिसून येते. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेच्या (सुप्टा) कार्यकारिणीची १८ मार्च २०२५ रोजी तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये चर्चेअंती सर्वानुमते शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करु नये आणि सध्या असलेले शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर' हेच नाव कायम ठेवावे, असा ठराव करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये असलेल्या शिक्षकांच्या वतीने हे निवेदन दिले आहे.