महाराणी ताराराणी समाधीस्थळावरुन शिवसेना ठाकरे गटाचा सरकारला अल्टिमेटम
schedule20 Apr 25 person by visibility 101 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार येत्या वर्षभरात करा, अन्यथा या समाधीस्थळाचे जीर्णोद्धार शिवसेनेतर्फे लोकसहभागातून करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना इंगवले म्हणाले, ‘महाराणी ताराराणी या करवीर संस्थापिका आहेत. त्या कोल्हापूरच्या रणरागिणी आहेत. त्यांच्या समाधीकडे दुर्लक्ष होत आहे, शिवसेना ठाकरे गट हे कदापि खपवून घेणार नाही. महायतुी सरकारने या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार का केला नाही ? हा मूळ प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन राज्य सरकारने सत्ता मिळवली. या सरकारच्या कालावधीत राष्ट्रपुरुषांचा अपमान होईल असे शब्द वापरले जात आहेत. महाराणी ताराराणी समाधीस्थळाकडेही त्यांनी पाठ फिरवली.
महाराणी ताराराणी यांनी अठरापगड जातींना सोबतीला घेऊन औरंगजेबाला महाराष्ट्रातच नेस्तनाबूत केले. समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी शिवप्रेमींनी वारंवार केली आहे. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. जर राज्य सरकार या समाधीचा जीर्णोद्धार येत्या वर्षभरात केले नाही तर कोल्हापूर शहर शिवसेनेतर्फे लोकसहभागातून जीर्णोद्धार केले जाईल.’असे इंगवले म्हणाले. पत्रकार परिषदेला शहरप्रमुख सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, रिमा देशपांडे, शशी बिडकर आदी उपस्थित होते.