महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापुराच्या काळात वीजपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसंबंधी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. महापुराच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत राहावा यासंबंधी आवश्यक सूचना केल्या. यावेळी माजी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.
‘कोल्हापूर शहर व परिसरात ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते तेथील विद्युत पुरवठा बंद करण्यात येतो. काही वेळेला पुराचे पाणी ओसरेपर्यत त्या भागातील वीज पुरवठा खंडित असतो. अनेक भागात पुराचे पाणी येत नाही, पण विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर हे पुराचे पाणी येते त्या ठिकाणी आहेत. यामुळे पूरबाधित नसलेल्या नागरिकांनाही विद्युत पुरवठा होत नाही. नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अशा ठिकाणचे ट्रान्सफार्मर पूरबाधित होत नसलेल्या भागात शिफ्ट करावेत. अथवा त्यांची उंची वाढवावी. जेणेकरुन नागरिकांना त्रास होणार नाही. तरी अशा ठिकाणचा सर्व्हे करुन निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा’अशी सूचनाही कदम यांनी केली. यासंबंधी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले.