राधानगरी- भुदरगडमधील आश्वासक नेतृत्व
schedule29 Nov 26 person by visibility 16 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: त्यांच्या कुटुंबांला सामाजिक व राजकीय वारसा लाभलेला… काँग्रेसच्या विचारसरणीत त्यांची जडणघडण झालेली… तोच वारसा अंगिकारत नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धडपडणारे व स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करताना व्यापक दृष्टीकोन बाळगून काम करणारे राधानगरी -भुदरगड तालुक्यातील आश्वासक नेतृत्व म्हणजे राहुल बजरंग देसाई अशी ओळख निर्माण झाली आहे. राहुल देसाई यांचा ३० नोव्हेंबर रोजी वाढदिवस. वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी, ३० नोव्हेंबर २०२६ गारगोटीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिसिंह नाना पाटील व्यासपीठ गारगोटी येथे सायंकाळी चार वाजता गोकुळमधील महाविकास आघाडीच्या तेरा संचालकांचा सत्कार व जाहीर सभा होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार सत्यजीत पाटील, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. वाढदिवस गौरव समितीच्यावतीने या सत्कार सोहळयाचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी मुदाळ ते गारगोटी बाइक रॅली काढण्यात येणार आहे.
राहूल देसाई यांनी विविध टप्प्यावर आपल्यातील नेतृत्व गुण सिद्ध केले आहेत. माजी आमदार बजरंग देसाई यांचा सामाजिक व राजकीय वारसा ते सक्षमपणे पुढे चालवित आहेत. शेतकरी, दूध उत्पादकांच्या न्यायासाठी आघाडीवर असतात. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढाईत ते आघाडीवर आहेत. राधानगरी- भुदरगडमधील नागरिकांनी त्यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्या बाजूनी कौल दिला आहे. या दोन तालुक्यातील युवकांच्यातही त्यांची क्रेझ आहे. युवक नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या राहुल देसाई यांच्याकडे या मतदारसंघातील आश्वासक चेहरा म्हणून पाहिले जाते. नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्यांना गोकुळवर निवडून दिले. बिद्री कारखान्यावरही ते संचालक म्हणून प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या पत्नी, रेश्मा देसाई या जिल्हा परिषद सदस्या आहेत.