शक्तीपीठप्रश्नी केपींची भूमिका आत एक बाहेर एक,त्यांच्यात दम असल्यास प्रकाश आबिटकरांच्या निवासस्थानावर मोर्चा काढावा
schedule29 Nov 26 person by visibility 46 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरुन माजी आमदार के. पी. पाटील यांच्या भूमिकेवरुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी टोले लगाविले. ‘के. पी. पाटील यांनी केवळ टीआरपी मिळवण्याकरिता आणि प्रसिद्धीसाठी घोषणा देऊ नयेत. त्यांच्यामध्ये, हिम्मत असेल तर रस्त्यावर उतरावे. ते ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाच्या नेत्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना सांगून त्यांनी शक्तीपीठचे काम थांबवावे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढावा.’असा शब्दांत आमदार पाटील यांनी के. पी. पाटील यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्केट यार्ड येथे झालेल्या बैठकीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरुन सरकारच्या धोरणावर टीका केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी, २८ सप्टेंबर रोजी ही बैठक झाली होती.त्या बैठकीत शक्तीपीठ महामार्गवरुन माजी आमदार के.पी. पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे रविवारी पत्रकारांनी प्रश्न केले.
अजिंक्यतारा कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील म्हणाले, ‘ प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गसंबंधी के. पी. पाटील यांची भूमिका आत एक आणि बाहेर एक अशी आहे. राज्यात आज भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे तीनही पक्ष सत्तेत आहेत. के. पी. यांच्यामध्ये हिंम्मत असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर शक्तीपीठ महामार्गविरोधात बोलावे. तुम्ही सत्तेत आहात, हा महामार्ग थांबवा. केवळ पत्रकबाजी करुन प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा रस्त्यावर उतरा. के. पींनी प्रकाश आबिटकरांच्यावर बोलायचं. आबिटकरांनी त्यांच्यावर बोलायचं. घोषणा देऊन टीआरपी वाढविण्यापेक्षा दम असेल तर रस्त्यावर उतरा. उद्या सकाळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या घरावर मोर्चा न्या, मग तुम्ही शेतकऱ्यांच्यासोबत आहात हे दिसू द्या. ’ पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, नगरसेवक राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे, अर्जुन माने, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, संभाजी पाटणकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, अमर पाटील शिंगणापूरकर, धीरज पाटील, सागर कोंडेकर आदी उपस्थित होते.
…………..
मुश्रीफांच्या विधानावर बोलणे टाळले
मंत्री मुश्रीफ यांनी ‘डिलिमिटेश्नविषयी सतेज पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्याशी बोलावे आणि पाठिंबा द्यावा’अशा शब्दांत डिवचले होते. पत्रकारांनी त्या विधानाकडे आमदार पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, ‘आपण ते विधान ऐकले नाही, मंत्री मुश्रीफ असे कोणत्या कार्यक्रमात बोलले’अशी विचारणा करत त्या विधानाविषयी जादा बोलणे टाळले.
…………….
सरकारने तारीख जाहीर करुन मोजणीसाठी यावे, ताकत दाखवू
‘शक्तीपीठ महामार्गसाठी पोलिस बंदोबस्तात सरकार मोजणी करत आहे. मात्र शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविल आहे. शेतकरी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. दुसरीकडे पोलिस बंदोबस्तात, पहाटेच्या सुमारास मोजणी करण्याचा खटाटोप सरकार करत आहे. सरकारने, शेतजमीनीच्या मोजणीची तारीख जाहीर करावी आणि मोजणीसाठी यावे. मग त्यांना आमची ताकत दाखवू. आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्यासोबत असतील.’असा इशारा आमदार पाटील यांना दिला.