पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांचा शाळेच्या आवारात मुक्काम ! महापालिका शाळेची कमाल !!
schedule29 Mar 25 person by visibility 2697 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या शुभदिनी शाळा-शाळांत प्रवेशोत्सव कार्यक्रम असतो. यादिनी पाल्यांचा प्रवेश निश्चितीसाठी एकच लगबग पाहावयास मिळतो. कोल्हापुरात मात्र गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच महापालिकेच्या मालकीच्या जरगनगर विद्यामंदिर येथे पालकांनी गर्दी केली आहे. रविवारी (३० मार्च २०२५) सकाळी आठ वाजता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र याच शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी शनिवारी (२९ मार्च) सकाळपासूनच हजेरी लावायला सुरुवात केली आहे. सायंकाळी सात वाजता तर शालेय परिसर पालकांनी गजबजला आहे.
पहिलीचे मर्यादित प्रवेश आणि पालकांची मोठी गर्दी यामुळे शाळा व्यवस्थापनसमोर कोणाकोणाला प्रवेश द्यायचा हा मोठा प्रश्न पडला आहे. गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून जरगनगर विद्यामंदिराची ओळख बनली आहे. शैक्षणिक गुणवत्तासह विविध प्रकारच्या परीक्षेतही येथील विद्यार्थ्यांनी सातत्याने यश मिळवले आहे. या शाळेची पटसंख्या २४०० हून अधिक आहे.
दरवर्षी येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिलीचे प्रवेश निश्चित होतात. यंदाही, पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून हजर राहू लागले. सायंकाळपर्यंत ही गर्दी वाढत गेली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तर या ठिकाणी शेकडो पालकांनी गर्दी केली. पहिलीसाठी प्रवेश क्षमता ३५० विद्यार्थ्यांची आहे. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांना विनंती केली, की रविवारी सकाळी पहिलीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. तेव्हा सकाळी उपस्थित राहावे, पण पालक जागेवरुन हलण्यास तयार नाहीत. पालकांची गर्दी पाहून शाळा व्यवस्थापन समितीने रात्री आठ वाजेपर्यंत जे पालक उपस्थित होते त्यांना टोकन देण्याचा निर्णय घेतला. मुख्याध्यापिका निता ठोंबरे, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रशांत जरग व अन्नशिक्षकांच्या हस्ते टोकन वाटप झाले. रात्री साडेनऊ वाजता टोकन वाटप करुन पालकांना घरी पाठवले.