पीसीएम ग्रुपची २७ एप्रिलची परीक्षा रद्द ! पाच मेला होणार सीईटीची फेरपरीक्षा !!
schedule01 May 25 person by visibility 108 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सामाई प्रवेश परीक्षा कक्षतर्फे २७ एप्रिल २०२५ रोजी झालेली पीसीएम ग्रुपची सकाळच्या सत्रात झालेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामध्ये गणित विषयांशी निगडीत २१ प्रश्नांचे पर्यायी उत्तर चुकीचे होते. यासंबंधी पालक व विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे तक्रारी केल्या होत्या. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी २७ एप्रिल रोजी झालेली सीईटी परीक्षा रद्द करुन आता पाच मे २०२५ रोजी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम.’ने २७ एप्रिल रोजीच्या सकाळच्या सत्रातील पेपरमधील चुकावर प्रकाशझोत टाकला होता. ‘सीईटीचे गणित चुकले, पर्यायी उत्तरे चुकीची’अशी बातमी प्रसिद्ध करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. या परीक्षेच्या उमेदवारांनी, फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी केली होती. “ महाराष्ट्र न्यूज वन” ने विद्यार्थ्यांचा हा आवाज प्रबळ केला होता.
विद्यार्थी, पालकांच्या तक्रारी, प्रसारमाध्यमांनी उठविलेला आवाज या साऱ्याची दखल घेत सीईटी कक्षातर्फे फेरपरीक्षा होणार असल्याचे घोषित केले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ३० एप्रिल रोजी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ ही सामाईक प्रवेश परीक्षा ९ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत झाली. या परीक्षेदरम्यान पीसीएम ग्रुपची २७ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षांमध्ये उमेदवारांना गणित विषयाशी संबंधित तांत्रिक अडचणी उद्भ्वल्याबाबत उमेदवारांनी ई मेल, पत्र, तिकिट सिस्टीम, दूरध्वनी आणि प्रत्यक्ष सीईटी कक्षास भेट देऊन तक्रारी नोंदविल्या होत्या. त्या उमेदवारांच्या तक्रारींची दखल घेत विद्यार्थी हिताच निर्णय घेतला आहे.
त्यानुसार २७ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात झालेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांची फेरपरीक्षा पाच मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. त्या परीक्षेस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनाच फेरपरीक्षा देणे अनिवार्य आहे. फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी राज्य सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर www.mahaact.org भेट द्यावी असे म्हटले आहे.