केएमएतर्फे दोन दिवसीय वैद्यकीय परिषद, डॉ. विवेकानंद कुलकर्णींना जीवन गौरव पुरस्कार
schedule22 Oct 26 person by visibility 40 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे.’ अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ए .बी पाटील,परिषदेच्या अध्यक्षा डॉ. गौरी साईप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेंगळुरू येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर आणि सोलापूरचे नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सयाजी येथे आयोजित या परिषदेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे. ‘अवघा रंग एक’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून परिशदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये तज्ञांकडून विविध विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. केएमएच्या वतीने दिला जाणारा डॉ.अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पोटविकार तज्ञ डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. हा समारंभ रविवारी दुपारी बारा वाजता होणार आहे. परिषदेला मुंबईतील नामांकित डॉ. रॉय पाटणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मुंबईतील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अनंत जोशी हे ' स्पोर्ट्स मेडिसीन आणि इजा वीरहित व्यायाम' या विषयावर आणि मुंबई येथील योग तज्ञ रूपा चक्रवर्ती " योग " विषयावर लोक जनजागृती पर व्याख्यान देणार आहे. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. दरम्यान वैद्यकीय परिषदेत गर्भावस्थेपासून बालपणापर्यंत कोणती काळजी घ्यावी,संधिवात, मधुमेहामधील आहार, यकृताचे आजार , राष्ट्रीय अतिदक्षता विभागाचा कोल्हापूरमध्ये विकास,स्तंभन दोष,चष्म्यातून मुक्ती, रक्तविकार, मेंदूविकार अशा अनेक विषयांवर चर्चा आणि तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेस देशभरातून ६०० डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे.पत्रकार परिषदेला वैद्यकीय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. संदीप पाटील, सचिव डॉ.अर्जुन अडनाईक, खजानीस डॉ. प्रवीण नाईक, डॉ. दिलीप पाटील,डॉ. आर.एस. पाटील, डॉ. विजय गावडे, डॉ. अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.