जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार, राहुल पाटील यांना आमदार करणार- हसन मुश्रीफ
schedule25 Jan 26 person by visibility 227 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ करवीर विधानसभा मतदार संघातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा विजय हीच स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली ठरेल,’ असे भावनिक आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या माध्यमातून स्वर्गीय पी एन पाटील आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेला आदर आपण सर्वांनी व्यक्त करू आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला अन्याय भरून काढू या. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार म्हणजे होणार. तसेच राहुल पाटील यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही.’ असेही ते म्हणाले.
करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार शुभारंभात मंत्री मुश्रीफ बोलत होते. स्वयंभूवाडी येथील श्री. स्वयंभू मंदिर परिसरात सभा झाली. जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर म्हणाले, या परिसरातील वाड्या वस्त्यांपासून गावागावांपर्यंत विकासामध्ये स्वर्गीय पी. एन. पाटील यांचे योगदान मोठे आहे. या भागातील जनतेनेही त्यांना नेहमीच ताकद दिली. त्यांच्या जाण्यानंतर ही जनता माझ्याही पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिली. यापुढेही जनता या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील.सांगरुळ जिल्हा परिषद मतदार संघ उमेदवार रेखा प्रकाश मुगडे, सांगरूळ पंचायत समिती मतदार संघ उमेदवार मेघा आनंदराव नाळे व बहिरेश्वर पंचायत समिती मतदार संघ उमेदवार लता सूर्यकांत दिंडे यांचीही भाषणे झाली. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शंकरराव पाटील, महेश पाटील, संतोष पोरलेकर, शिवाजीराव देसाई, भाजपच्या सरचिटणीस सुशीला पाटील, कृष्णात चाबूक, सचिन पाटील, शामराव सूर्यवंशी, सुभाष सातपुते, प्रकाश पाटील, डॉ. सुरेश मोरे, विलास पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.