धूल चेहरे पे थी, लेकिन आईना साफ करता रहा ! मुश्रीफांचा संजय मंडलिकांना उद्देशून टोला
schedule23 Jan 26 person by visibility 40 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आम्ही त्यांनाही युतीसाठी निमंत्रण दिले होते. परंतु; ते घडले नाही. आज जरी घडले नसले तरी ते भविष्यात घडेल अशी अपेक्षा करू या.’ असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे नाव न घेता व्यक्त कले. त्याचवेळी त्यांनी‘उम्रभर भूल करता रहा, धूल चेहरे पर थी,’ असा शेरही म्हटला.
पंचायत समिती, जिल्हा परिषद पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा कागल येथील गहिनीनाथनगरच्या पटांगणात झाला. यावेळी मुश्रीफ म्हणाले, ‘ माजी आमदार संजय घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे आणि माझी विधायक वळणावर युती झालेली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय सार्थ आहे हे दाखवून द्या. महाराष्ट्रात इतिहास निर्माण असा उच्चांकी विजय घडवा, आमची तिघांची ही केवळ युती नाही तर नवी रणनीती आहे.’
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, आमची ही युती कुणाला एकटे पाडण्यासाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो. कागलप्रमाणे या निवडणुकीतील सर्व उमेदवार राज्यात उच्चांकी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करुया.’ माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘संघर्षातून विकास आणि विधायक होणार नाही ही स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांची भूमिका होती. युतीचा हा दिवस बघायला ते असते तर धन्य झाले असते.’ गोकुळचे माजी चेअरमन रणजीत पाटील,गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम, राजेंद्र भोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी स्वागत केले. विजय काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विरेंद्रसिंह घाटगे, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, युवराज पाटील, एम. पी. पाटील, नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, सुर्यकांत पाटील, कृष्णात पाटील, राजेखान जमादार, धनराज घाटगे उपस्थित होते