शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत ! सात पक्षीय उमेदवार, २३ अपक्ष रिंगणात !
schedule10 Oct 26 person by visibility 53 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर -: पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात तब्बल ३० उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात विविध पक्षाकडून सात उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर २३ उमेदवार अपक्ष म्हणून नशिब आजमावत आहेत.
काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगावकर, भारतीय जनता पक्षाकडून विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून माजी आमदार दत्तात्रय सावंत, कायम विना अनुदानित कृती समितीचे नेते खंडेराव जगदाळे यांच्यामुळे ही लढत बहुरंगी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीने काही प्रमाणात बंडखोरी रोखण्यात यश मिळवले. तथापि पंढरपूर येथील प्रा. बी.पी. रोंगे हे भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक होते. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक म्हणून काम केलेले. प्रा. सचिन सानप यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. या दोघांनाही संबंधित पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, हे दोघे आता अक्ष म्हणून लढत आहेत. माजी आमदार सावंत यांनीही भाजप, शिवसेनेकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता. जगदाळे हे महाविकास आघाडीकडून प्रयत्नशील होते. मात्र महाविकास आघाडीतंर्गत शिक्षक मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. भाजपने, कौस्तुभ गावडे यांच्या रुपाने तरुण चेहरा शिक्षक मतदारसंघात उतरविला आहे.
याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून इकबाल चंदूलाल तथा आय सी शेख, प्रा आर. वाय. घुटुकडे, प्रा. दिपाली सुर्यवंशी जेठे, राजेश कराडे उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून अनिल देवदान मोहिते, अभिजीत वामनराव बिचुकले, सचिन केशवराव आढळराव, कपिल शंकर कोळी, तानाजी मारुती नाईक, दिलीप कचरे, प्रफुल्ल महादेव तावरे, फत्तेसिंह पवार, प्रा. बी. पी. रोंगे, बाबासाहेब तुकाराम साबळे, बाळासाहेब उर्फ गंगाधर जगन्नाथ गोतारणे, बाळू महादेव शेलार, महेश सुर्याजी साळुंखे, रजनीश श्रीकांत पिसे, सुनील संभाजी लंगडे, वैशाली विजय शिंदे, राजेंद्र संपतराव शिर्के, सचिन नवनाथ सानप, सदाशिव सिदधू कांबळे, सिताराम दुंदा भौरले, सुधीर सुर्यकांत विसापुरे, सुनील जगताप रिंगणात आहेत.
……….
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण मतदार संख्या ६२ हजार
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १६,८८२ मतदार.
सोलापूर जिल्ह्यात १५,३०३ मतदार.
कोल्हापूर जिल्ह्यात १२,२९९ मतदार.
सांगली जिल्ह्यातील मतदारसंख्या ९४५४.
सातारा जिल्ह्यातील शिक्षक मतदार संख्या ८०६२.