मॅकच्या अध्यक्षपदी मोहन कुशिरे, उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील
schedule16 Oct 25 person by visibility 22 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले [मॅक] या संस्थेच्या अध्यक्षपदी मोहन कुशिरे, उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळाची बारावी सभा झाली. २०२५ - २०२६ या वर्षाकरिता नूतन पदाधिकाऱ्यांची या सभेत निवडी करण्यात आल्या. रामप्रताप झंवर सभागृहात ही सभा झाली.
संस्थेच्या मानद सचिवपदी सुरेश महादेव क्षीरसागर, मानद खजिनदारपदी अमृतराव तुकाराम यादव यांची निवड करण्यात आली. फेरनिवडीबद्दल सर्व संचालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानताना अध्यक्ष कुशिरे म्हणाले “संस्थेच्या माध्यमातून उद्योजक व कामगार बांधवांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. संस्थेची भव्य वास्तू उभारणे आणि कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करणे हे आमचे प्रमुख ध्येय असून, मूलभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू”. “गेल्या वर्षभरात संचालक मंडळ, माजी अध्यक्ष, सभासद आणि हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे मॅकने औद्योगिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. हीच गती पुढे कायम ठेवून अधिक गुणवत्तापूर्ण काम करणार आहोत.” या निवडीप्रसंगी मॅकचे संचालक अशोक दुधाणे, संजय जोशी, संजय पेंडसे, हरिश्चंद्र धोत्रे, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील तसेच सचिव शंतनू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.