शुक्रवारी दूध उत्पादकांना गोड बातमी ! डिबेंचर कपातीचा निर्णय हा महादेवराव महाडिकांच्या नेतृत्वकाळातच–अरुण डोंगळे
schedule16 Oct 25 person by visibility 62 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘डिबेंचर कपातीचा निर्णय हा काही आजचा नाही. १९९३ मध्ये डिबेंचर कपातीसंबंधी निर्णय घेतला आहे. गोकुळचे तत्कालिन नेते माजी आमदार महाडिक यांच्या नेतृत्वकाळापासूनच डिबेंचर कपात होते. प्राथमिक दूध संस्थांना आर्थिक दृष्टया भक्कम करणारा हा निर्णय आहे.’ असे उत्तर गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दिले. डिबेंचर कपातीवरुन सुरू असलेल्या आंदोलनावरुन आयोजित संचालक व आंदोलनकर्त्यांच्या बैठकीत बोलताना संचालक डोंगळे यांनी, ‘गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, दूध उत्पादकांना पैसे द्यायचेच आहेत. शुक्रवारी (१७ ऑक्टोबर २०२५) तो जाहीर होईल, गोड बातमी मिळेल.’असेही त्यांनी सांगितले.
डिबेंचर कपातीच्या विरोधातील मोर्चानंतर प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादकांचे प्रतिनिधी यांची गोकुळचे संचालक व प्रशासनासोबत बैठक झाली. संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जवाब दो मोर्चा निघाला होता. ताराबाई पार्क येथील कार्यालयात ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाळासाहेब खाडे, अजित नरके प्रा. किसन चौगले, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील आणि कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आणि प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादक प्रतिनिधींचे शिष्टमंडळ अशी चर्चा झाली. या चर्चेत संचालिका शौमिका महाडिक व प्राथमिक दूध संस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना डोंगळे यांनी स्पष्टीकरण दिले.
डोंगळे यांनी डिबेंचर कपातीसंबंधी बोलताना तपशीलवार मांडणी केली. ते म्हणाले, ‘१९९३ मध्ये डिबेंचर कपातीचा निर्णय झाला. माजी आमदार महादेवराव महाडिक हे गोकुळचे नेतृत्व करत होते. आनंदराव पाटील चुयेकर, वसंतराव मोहिते, अरुण नरके हे सहकारातील जाणकार माणसे होती. अरुण नरके तर दहा वर्षे चेअरमन होते. डिबेंचर कपातीसंबंधी डॉ. वर्गीस कुरियन यांचेही मार्गदर्शन घेतले होते. आज गोकुळचा जो विस्तार दिसतो त्यामध्ये पूर्वीच्या कार्यकारिणीचे, नेतेमंडळीचेही योगदान आहे. आणि आताच्या नेतेमंडळीचेही योगदान आहे. पूर्वीचा कारभार आणि आताचा कारभार या दोन्हीचे आम्ही साक्षीदार आहोत. आता प्राथमिक दूध संस्था वाढल्या, अनेक गोष्टी झाल्या, पण सगळे काही सांगता येत नाही.
.......................
ठेवीवरुन संचालकांच्या दोन आकडेवारी, डोंगळे म्हणतात ३०० कोटी, नरके म्हणाले ५१२ कोटी ठेवी
या चर्चेत गोकुळच्या ठेवीचा विषय उपस्थित झाला. त्यासंबंधी बोलताना अरुण डोंगळे म्हणाले, ‘गोकुळच्या ठेवी ५१२ कोटी रुपयाच्या आहेत असे आपण सारे सांगतो. पण सत्य काही ते सांगायला हवे, वास्तवात त्या ठेवी २९० ते ३०० कोटीच्या घरात आहेत. उर्वरित रक्कम अन्य बाबीसाठी राखीव ठेवल्या आहेत.’ त्यानंतर बोलताना संचालक अजित नरके यांनी गोकुळच्या ५१२ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत याचा पुनरुच्चा केला. २९० ते ३०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर उर्वरित सव्वा दोनशे कोटी रक्कम अंतिम दूध दर फरक, बोनस, लाभांश या नावांनी ठेव आहेत. विविध बाबीसाठी त्या तरतूद केल्या असल्या तरी ठेव म्हणूनच त्या रकमेची गुंतवणूक आहे. असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी कोणत्या कामासाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे याची आकडेवारी सांगितले. तसेच २७ कोटी पन्नास लाख रुपयांचे नवीन प्रोजेक्ट सुरू असल्याचे निदर्शनास आणले.