डिबेंचर कपातीवरुन गोंधळ, जनावरांसहित गोकुळवर धडक ! आंदोलक-पोलिसात झटापट !!
schedule16 Oct 25 person by visibility 186 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कपात केलेली डिबेंचरची रक्कम परत मिळावी या मागणीसाठी प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी आणि दूध उत्पादकांनी गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा गोकुळच्या कार्यालयावर धडक दिली. ‘परत करा-परत करा, डिबेंचरची रक्कम परत करा’अशा घोषणा देत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोर्चा ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयावर धडकला. या ठिकाणी पोलिस व सुरक्षा रक्षकांनी जनावरे बाजूला हटविण्यास सांगितले. यावर दूध उत्पादक व संस्था प्रतिनिधींनी जनावरांना गेटच्य आत घेऊन जाणार असा आक्रमक पवित्रा घेतला. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी गेटच्यासमोर कडे केल्याने आंदोलकही संतप्त बनले. दोघांमध्ये वादावादी व प्रचंड झटापट झाली. एकीकडे पोलिस व सुरक्षा रक्षक जनावरांना बाजूला हटविण्याचा प्रयत्नात तर दुसरीकडे दूध उत्पादक व संस्था प्रतिनिधीही जनावरांना सोबत घेऊन गेटच्या आत जाण्यासाठी सरसावलेले, यामुळे गेटवर प्रचंड गोंधळाची स्थिती होती. आक्रमक बनलेल्या आंदोलकांनी जोरदार धडक देत गेट उघडत जनावरासहित कार्यालय परिसरात प्रवेश केला. पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना हटविण्याचा प्रयत्न केल्यामुळे तणाव निर्माण झाला.
गोकुळ कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सभा झाली. दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादकांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. संचालिका शौमिका महाडिक यांनी, ‘प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादकांच्या हितासाठी हा मोर्चा निघाला आहे. दूध संस्था प्रतिनिधींनी निवेदन देऊनही गोकुळ प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही. गोकुळ प्रशासनाने सहकार्य करावे. दूध उत्पादक व प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधीनीसह सारेजण शांततेने लढून न्याय मिळवू.’असे आवाहन करत साऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यानंतर वीसहून अधिक जणांच्या शिष्टमंडळांनी, गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, बाळासाहेब खाडे, प्रा. किसन चौगुले, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील, प्रकाश पाटील, करणसिंह गायकवाड व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्याशी चर्चा केली.
तत्पूर्वी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सर्किट हाऊस येथून ‘जवाब दो’मोर्चाला सुरुवात झाली. विविध तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादक मोर्चात सहभागी झाले. संचालिका महाडिक, प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव, दिपक पाटील, धैर्यशील देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावकार मादनाईक, किसान सेलचे भगवान काटे, प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी युवराज पाटील, प्रवीण पाटील, तानाजी पाटील, प्रताप पाटील, हंबीरराव पाटील, जोतिराम घोडके, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकासहित शेकडोजण मोर्चात होते.
मोर्चातील ‘डिबेंचर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे-नाही कुणाच्या बापाचे, नेत्यांची दिवाळी-शेतकऱ्यांचे दिवाळे, परत करा परत करा-डिबेंचर परत करा, डिबेंचरचे पैसे कुणाच्या खिशात’या मजकुराचे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. म्हैस आणि गायींना घेऊन दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादक मोर्चातून मार्गस्थ झाले. सर्किट हाऊस ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौक, पितळी गणपती चौक ते गोकुळ कार्यालयावर मोर्चा पोहोचला. मोर्चातील जनावरांना गोकुळने ओला चारा आणून ठेवला होता. दरम्यान मोर्चा गेटवर पोहोचल्यावर जनावरे आत सोडण्यास पोलस व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विरोध केला. तर दूध उत्पादक व संस्था प्रतिनिधी जनावरे आत सोडा यासाठी आक्रमक झाले. गेटसमोर गोंधळाची स्थिती निर्माण झालीं. शाब्दिक बाचाबाची वाढून झटापटीपर्यंत प्रकरण पोहोचले. आक्रमक बनलेल्या दूध संस्था प्रतिनिधी व उत्पादकांनी गेटवर धडक देत आतमध्ये जनावरांसहित प्रवेश केला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. अमल महाडिक यांचा विजय असो अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.