सगळयांनी हातात हात घालून काम केल्यावर विकासाच्या पातळीवर कोल्हापूर फर्स्ट येईल-प्रकाश आबिटकर
schedule09 Mar 25 person by visibility 647 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ उद्योग आणि गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत कोल्हापूरच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू. सर्वांनी मिळून ठरविले तर कोल्हापूर फर्स्ट येण्यासाठी वेळ लागणार नाही. विकास आणि पर्यटन या महत्त्वाच्या दोन घटकांना पुढे घेवून जाण्यासाठी रस्ते हा प्रमुख घटक आहे. यासाठी स्थानिक दोन्ही आमदार व खासदार निश्चितच वेगाने निर्णय घेतील. ’असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरातील विविध १४ संघटनांनी एकत्र येऊन विकासकामांसाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी (९ मार्च २०२५) हॉटेल पॅव्हेलियन येथे दिमाखदार सोहळयात झाला. खासदार शाहू महाराज छत्रपती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोल्हापूर फर्स्ट लोगोचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूरची क्षमता ओळखून राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद येथे घेतली. २५२ कोटी रूपयांचे कन्व्हेंशन सेंटर मंजुर झाले यातील ५० कोटी रूपये बजेटमध्ये दिले असून लवकरच काम सुरू होईल. उद्योगधंदे आणि विकासात वाढ होण्यासाठी शक्तिपीठ महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थव्यवस्थेला सुदृढ करण्यासाठीच्या प्रक्रियेत कोल्हापूर मध्येही वचनपूर्ती या कोल्हापूर फर्स्टच्या उपक्रमातून होईल. कोल्हापूरच्या विकासाच्या प्रक्रियेत साऱ्या घटकांनी संघटितपणा दाखविला ही आनंदाची बाब आहे. शाहू महाराज म्हणाले, ‘शाश्वत विकासाला प्राधान्य देत जनतेच्या हितासाठी जिथं विकास तिथं सर्वांनी एकत्रित या. ‘कोल्हापूर फर्स्ट’ उपक्रमाचा मुख्य उद्देश कोल्हापूरचा विकास पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून करणे हा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनाही सहभागी करून घ्या.’
उपक्रमाचे सहसमन्वयक ॲड.सर्जेराव खोत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पर्यटन सर्कीट तयार करून पर्यटन विकासाला चालना देता येईल. तीर्थक्षेत्र विकासामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल असे स्पष्ट केले. क्रीडा प्रतिष्ठानचे बाळ पाटणकर, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, आयटी असोसिएशनचे प्रताप पाटील, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, गोशिमाचे स्वरुप कदम यांनी स्वागत केले. प्रा. क्षितिजा ताशी यांनी सूत्रसंचालन केले. इंजिनीअरिंग असोसिएशनचे बाबासो कोंडेकर यांनी आभार मानले. व्यासपीठावर आमदार राहूल आवाडे, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अशोकराव माने यांची उपस्थिती होती.