गाळेधारकांना सवलत योजना लागू करावी – कोल्हापूर चेंबरतर्फे मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी
schedule08 Mar 25 person by visibility 391 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महानगरपालिका फेब्रुवारी / मार्च मध्ये ज्याप्रमाणे घरफाळा, पाणीपट्टी, व्यवसाय परवाना यांना सवलत योजना लागू करते त्याप्रमाणे गाळेधारकांना दंड व्याजामध्ये सवलत योजना लागू करण्यासंबंधी कोल्हापूर प्रशासनास अवगत करावे अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी ही भेट घडवून आणली. सुरुवातीस महाराष्ट्रातील स्थानिक संस्था कर विभाग कायमचा बंद करण्याचा शासन आदेश काढल्याबद्दल व सीमा तपासणी नाके बंद करण्याच्या निर्णयाबद्दल अध्यक्ष संजय शेटे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गाळेधारकांच्या भाड्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून यावर लवकरच योग्य तो तोडगा काढू अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. शिष्टमंडळात उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, मानद सचिव अजित कोठारी, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.