दिवाळीची खरेदी करुन घरी जाताना टेम्पोंची धडक, भाऊ-बहिणीसह पुतणी ठार
schedule21 Oct 25 person by visibility 219 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिपावली सणाची धामधूम, खरेदीची लयलूट, शुभेच्छांचा वर्षाव असा हर्षोल्हास सर्वत्र सुरू असताना मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कौलव येथे अपघात झाला. कोल्हापूर-राधानगरी मार्गावर कौलव येथील दत्त मंदिराजवळील रस्त्यावर या अपघातामध्ये तिघे जण ठार झाले. चुकीच्या दिशेने आलेल्या आयशर टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील श्रीकांत बाबासो कांबळे (तरसबळे, ता. राधानगरी) व दिपाली गुरुनाथ कांबळे (शेंडूर, ता कागल) हे भाऊ-बहिण व पुतणी कौशिकी सचिन कांबळे हे तिघे ठार झाले. अन्य एक जण जखमी आहे.
दिवाळी सणाचा बाजार करुन घरी परतताना घडलेल्या अपघातामध्ये बहिण-भावाचा अंत झाला. या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे. श्रीकांत कांबळे हे बहिण दिपालीला घेऊन दिपावली सण खरेदीसाठी भोगावती येथे गेले होते. दरम्यान राधानगरीहून-कोल्हापूरकडे टेम्पो वेगाने निघाला होता. तर भोगावती येथे बाजार घेऊन श्रीकांत कांबळे व दिपाली कांबळै हे भाऊ-बहिण दुचाकीवरुन तरंसबळेकडे घरी निघाले होते. त्यांच्यासोबत दोन लहान मुले होती. हे चौघे मोटारसायकवरुन घराकडे जात होते. कौलव येथील दत्त मंदिरानजीक चुकीच्या दिशेने आलेल्या टेंम्पोने श्रीकांत कांबळे यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये श्रीकांत व बहिण दिपाली, पुतणी कौशिका सचिन कांबळे हिचा मृत्यू झाला. कौशिका ही श्रीकांत कांबळे यांची पुतणी आहे. तर दिपाली कांबळे यांचा मुलगा अथर्व हा अपघातात जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.