चंद्रावर पाणी आहे हे जगात पहिल्यांदा भारताने शोधले - इस्त्रोतील शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. शर्मा
schedule27 Nov 25 person by visibility 29 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गुणवत्तेच्या जोरावर किफायतशीर निधीमध्ये चांद्रयान मोहिमांच्या यशस्वीतेमुळे अवकाशसंशोधन क्षेत्रात भारताचा जगभरात दबदबा निर्माण झाला आहे. भारताच्या गावागावातून असलेले गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आणि युवक, युवती हेच भारताचे बलस्थान आहे. आम्ही या क्षेत्रात उशिरा आलो. परंतु प्रत्येक वेळी जगाने जे सिध्द केले नाहीत ते आम्ही केले. चंद्रावर पाणी आहे हे जगात पहिल्यांदा भारताने शोधून त्यामुळे भारत ‘लेट है लेकिन लेटेस्ट है’ कौतुकोद्गार इस्त्रोतील प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. शर्मा यांनी काढले.
प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त वर्धापनदिनी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी यादव, प्रशालेच्या माजी विद्यार्थीनी आणि शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, आर श्रीविद्या शर्मा,संस्थेचे चेअरमन उदय सांगवडेकर ,व्हाईस चेअरमन डॉ सुनील कुबेर, संस्थेच्या कार्यवाह शरयू डिंगणकर उपस्थित होते.
डॉ. शर्मा म्हणाले, १९७२ मध्ये इस्त्रोची स्थापना झाली आणि केवळ तीन वर्षात अडीच हजार किलोचा आर्यभट्ट हा उपग्रह भारताने रशियाच्या सहकार्याने पाठवला. सहा महिन्यांसाठी पाठवलेला हा उपग्रह तब्बल १० वर्षे कार्यरत होता ही भारताची कर्तबगारी आहे. २००८ मध्ये चंद्रयांन १ ही मोहिम राबविण्यात आली. त्याच्याआधी ३० वर्षे आधी अमेरिकेचा उपग्रह चंद्रावर उतरला होता. परंतु चंद्रावर पाणी आहे हे जगात पहिल्यांदा भारताने शोधून काढले. जे कोणी करू शकत नाही ते भारत करतो हे यावेळी सिध्द केले गेले. २०१४ मध्ये मंगलयान मोहिम राबविण्यात आली तर दहा वर्षांपूर्वी आदित्य ही सुर्ययान मोहिम राबविण्यात आली. २०१९ ला जरी अपयश आले तरी आम्ही खचलो नाही आणि कोणत्याही देशाला शक्य झाले नाही ते भारताने करून दाखवले आणि दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवले गेले. कारण या ठिकाणी अतिशय उपयुक्त अशा इंधनाची शक्यता आम्हांला वाटते.
शर्मा यांनी चांद्रयान मोहिमेची आठवण असलेले घड्याळ संस्थेला सस्नेह भेट दिले. शाळेच्या अटल टिंकलिंग लॅब मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रायव्हेट हायस्कूलचे संगीत शिक्षक सिताराम जाधव यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरमने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल हिरेमठ आणि अमित सुतार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नियामक मंडळाचे सदस्य मिलिंद करमळकर यांनी करून दिला. संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. सुनील कुबेर यांनी आभार मानले. याप्रसंगी प्राजक्ता इनामदार ,तृप्ती टिपुगडे, ज्योत्स्ना पोवार, शितल हिरेमठ ,आसावरी गुळवणी, बी एल पाटील, संतोष पाटील ,एकता सोळुंके, गिरीश जांभळीकर , नागनाथ भोसले, सुनील गोंधळी, प्रसन्न जोशी ,यशवंत मरळीकर यांना शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.