शिक्षणक्षेत्रात डॉ. बापूजी साळुंखे यांचे कार्य अद्वितीय !
schedule07 Aug 23 person by visibility 8540 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा आठ ऑगस्टला स्मृतिदिन. बापूजींच्या शैक्षणिक कार्याचे मोल मोठे. बहुजन समाजाला त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या शैक्षणिक-सामाजिक कार्यासंबंधी प्रतिक राजेंद्र साळुंखे यांनी लिहिलेला लेख...
‘देशभक्त क्रांतीकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला लढवय्या वीरांबरोबरच संत परंपरेचाही वारसा लाभला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जिल्ह्यात गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे म्हणजेच शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर येथे ९ जून १९१९ रोजी झाला. महाराष्ट्रातील शैक्षणीक विकासाचा इतिहास लिहिताना शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा, नोंद घेतल्याशिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही. त्यांचे या क्षेत्रातील कार्य फार महत्वाचे व अद्वितीय आहे.
बापूजींनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. तन, मन व धन अर्पन केले. अपार कष्ट उपसले. दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा यात पिचत पडलेल्या दुःखी समाजाचा उद्धार करावयाचा असेल तर शिक्षणासारखे दुसरे प्रभावी साधन नाही हे बापूजींनी ओळखले होते. ' जीवनात उदात्तता वाढली पाहीजे. बोलण्याप्रमाणे कृती असली पाहीजे. तरच स्वतंत्र देशातील नागरिक सुसंस्कारी होतील.
' ' ज्ञान पवित्र आहे. ते माणसाने मिळवल्यानंतर माणसाचे जीवन पवित्र होईल. म्हणून ते पावित्र्याने दिले व घेतले पाहिजे. तरच त्याचे परिणाम इष्ट स्वरूपात दिसतील. हे पावित्र्य कटाक्षाने सांभाळून शिक्षणप्रसार झाला आणि होत राहिला तर समाज निकोप राहील, सदृढ बनत जाईल व पर्यायाने सुखी व समाधानी बनेल. ' या श्रद्धेने व बदलती परिस्थिती आणि बदलत्या सामाजिक गरजा यांना अनुरूप अशा चिरंतन तत्वांची व त्यांच्या आचरणाची आवश्यकता ओळखून बापूजींनी नवीन शिक्षणसंस्था स्थापन करण्याचे ठरविले.
ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या त्रिसूत्रीवर आधारित सत्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा, त्याग व सेवा या खडतर तत्वांचा अंगीकार करून श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था १९५५ साली सुरू केली. अल्पावधीत या बीजाचे डेरेदार वृक्षात रूपांतर केले. शिक्षणासाठी तहानलेल्या, भुकेल्यांसाठी, दीन-दलितांसाठी त्यांच्या दारापर्यंत गंगोत्री नेऊन पोहचवली. सामान्य माणसांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची प्रकाशवाट खुली केली. बहुजनातील हजारो गुरुदेव कार्यकर्त्यांची कुटुंबे उभी राहीली. लाखो मुले शिकली.
बापूजींनी शिक्षणाची गंगोत्री महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यापर्यंत पोहचवली. आजसुद्धा लाखो विद्यार्थी बापूजींनी सुरू केलेल्या शैक्षणीक डेरेदार वटवृक्षाखाली आयुष्याची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात. बापूजींच्या विचारांचे आचारात रूपांतर करीत श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने सुमारे ४०० हून अधिक शाळा महाविद्यालये उभी करून शिक्षणाची ज्ञानगंगा आज सात दशकांनंतरही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.
शिक्षणक्षेत्रातील बापूजींचे भव्य-दिव्य कार्य पाहून समाज त्यांना ' शिक्षणमहर्षी ' म्हणू लागला. महाराष्ट्र शासनाने त्यांना ' दलित मित्र ' या किताबाने गौरविले. ११ फेब्रुवारी १९८६ रोजी शिवाजी विद्यापीठाने त्यांना ' डी.लिट ' ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अशा प्रकारे स्वतः चंदनासारखे झिजून बहूजन समाजास शिक्षणरूपी प्रकाश देणाऱ्या थोर महापुरुषाची प्राणज्योत ८ ऑगस्ट १९८७ रोजी पंचतत्वात विलीन झाली. त्यांचे कार्य गुरुदेव कार्यकर्त्यांना स्फूर्ती व प्रेरणा देणारे आहे. त्यांच्यामुळे आमचे जीवन सार्थक झाले.’