बास्केट ब्रिजसह कोल्हापुरातील उड्डाणपुलासाठी ६२४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला तत्वत: मान्यता
schedule17 Feb 25 person by visibility 212 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयक विकास कामांचा आढावा कोल्हापूर विमानतळ येथे घेतला. कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पुरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा ६२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला त्यांनी तत्त्वत: मान्यता दिली. याबाबतचे संकल्प चित्र डिझाइन तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरील यवलूज ते शिवाजी पूल अशा १०.८ किमी रस्त्याचे रूंदीकरण, पुराच्या पाण्याच्या ठिकाणी उंची वाढविणे, पुराच्या पाण्यामुळे जो बंधारा निर्माण होत आहे त्या ठिकाणी काँक्रीटचे मोठे बॉक्स देणे जेनेकरुन वाहतूकीस अडथळा न होता पुराच्या पाण्याचा लवकर निचरा होईल. तसेच कोल्हापूर शहरातील शिवाजी पूल ते तावडे हॉटेल पर्यंतचा ६.८ किमीचा उड्डान पूलासाठी तत्वत: मान्यता दिली. यासाठी आवश्यक लाईट व पाऊसपाणी निचरा इ. अनुषंगिक कामांसाठी आवश्यक निधी महापालिका व राज्य सरकारने करावा असे ठरले. गगनबावडा ते रत्नागिरी मार्गावर महापालिकेच्या जागेवरील दोन किमीचा जोड रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देवून शहरातील फ्लायओवरला जोडावा असाही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच सुरू असलेल्या सातारा कागल रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करून डिसेंबर २०२५ पुर्वी सर्व कामे पुर्ण करण्याच्या सूचना केल्या.
रत्नागिरी -कोल्हापूर रस्त्यावरील असलेले जमीनीचे अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जमीनीचे प्रश्न आठ दिवसात मिटवून ती जागा हस्तांतरीत करू. तसेच ज्यांचे पैसे वाटप शिल्लक आहे त्यांचेपण एक महिन्यात पैसे वाटप करून तीही जागा हस्तांतरीत करू असे सांगितले. यामुळे राष्ट्रीय महामार्गचे आंबा ते पैजारवाडी व पैजारवाडी ते चोकाक ही दोन्ही कामे एप्रिल २०२६ अखेर पुर्ण होणार आहेत. याठिकाणच्या लोकप्रतिनीधी व नागरिकांच्या मागणीनुसार आंबा ते पैजारवाडी या दरम्यान ५ अंडरपास व ७ किमीच्या सेवा रस्त्याला तसेच पैजारवाडी ते चोकाक यादरम्यानच्या ५ अंडरपास व १७ किमीच्या सेवा रस्त्यालाही यावेळी तत्वत: मान्यता देण्यात आली. तसा प्रस्तावही दिल्लीला सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
……………………………….