गोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटील
schedule30 Apr 26 person by visibility 85 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ मला महायुतीचा धर्म चांगलाच ठाऊक आहे. मात्र गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना सोडून कोणीशीही युती करा, मुश्रीफ हे कोल्हापुरात भाजप कधीच वाढू देणार नाहीत. त्यांनी कायम दुसऱ्यांचा वापर करुन फेकून दिले आहे. मात्र निवडणुकीतील युतीबाबत अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. त्यांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असेल.’अशी रोखठोक भूमिका चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडली. मंत्री मुश्रीफ हे प्रामाणिक कारभाराचा डांगोरा पिटतात, मग ते प्रशासकाला का घाबरत आहेत ? ’असा सवालही आमदार पाटील यांनी केला.
गोकुळ दूध संघाशी संलग्नित १२०० हून अधिक दूध संस्थांच्या पात्रतेसंदर्भातील सुनावणी गुरुवारी झाली. प्राथमिक दूध संस्थांच्या सध्या सुरूअसलेल्या सुनावणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतरच निवडणुका घ्या. असे सर्किट बेंचने आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान संचालकांच्या मुदतवाढीला कोर्टाने स्पष्ट नकार दिला असेही ते म्हणाले. दरम्यान सर्किट बेंचमधील सुनावणीनंतर सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र सोडले. मंत्री मुश्रीफ यांच्याशी आपला वैयक्तिक वाद नाही. मात्र गोकुळमधील भ्रष्टाचार आपण खपवून घेणार नाही. गोकुळमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या आहेत. त्या साऱ्या तक्रारीची चौकशी होईल. गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याचा कणा आहे. गोकुळवर कोल्हापूर जिल्हयाचं राजकारण चालते. लाखो दूध उत्पादक शेतकऱ्याशी निगडीत ही संस्था आहे. ही संस्था पारदर्शकपणे चालली पाहिजे, दूध उत्पादकांच्या हितासाठी आपला लढा आहे.’असे पाटील यांनी स्पष्ट केले. ‘मुश्रीफ हे जिल्हयाचे नेते आहेत, मंत्री आहेत.त्यांच्याकडे केडीसी बँक आहे, गोकुळमध्यफे सत्ता आहे. बाजार समिती त्यांच्या ताब्यात आहे.आणखी काही गोष्टी आहेत त्याही समोर आणू. मुश्रीफ हे प्रामाणिक असल्याचे सांगतात, मग प्रशासकाला का घाबरता?’असेही पाटील म्हणाले.
गोकुळमध्ये प्रशासक नेमला जाणार याचा त्यांनी पुनरूच्चार आमदार पाटील यांनी केला. त्याचवेळी आमदार पाटील यांनी गोकुळच्या कारभारावरुन चेअरमन नविद मुश्रीफ व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यावरही निशाणा साधला. या तिघांची ईडीमार्फत चौकशी होईल. ज्येष्ठ संचालकांनी प्रचंड मालमत्ता जमविली आहे. ईडीची चौकशी लागणार म्हणून गेले महिनाभर ते स्वतच्या नावावरील मालमत्ता नातेवाईकांच्या नावावर करत आहेत असा आरोप आमदार पाटील यांनी केला.
गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे म्हणाले,‘सर्किट बेंचने दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेतला. कोणावरही अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. सगळया संस्था अपात्र ठरविण्याचे पाप आम्ही करणार नाही. चौकशीत ज्या संस्थेचे कामकाज योग्य आहे, त्या पात्र ठरतील. गोकुळचा कारभार चांगला चालावा अशी आमची भूमिका आहे. दूध संकलन १८ लाख होते, २५ लाख संकलन कुठून आले. बेळगावमधील दूध उत्पादकांकडून् २६ रुपये दराने दूध खरेदी करतात. गोकुळचा खरेदी दर हा ३९ रुपये आहे. यातील तफावत कुठे गेली असा सवाल बेलवाडे यांनी केला.