कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफ
schedule28 Apr 26 person by visibility 29 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोरोनाशी भिडताना हे पुस्तक केवळ एका संकटाचा दस्तऐवज नसून मानवी जिद्दीची ही एक गाथा आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी दोन हात करताना समाजमनाने सोसलेल्या यातना, प्रशासकीय लढा आणि माणुसकीचे दर्शन या पुस्तकातून घडते. ’असे उद्गगार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
पत्रकार समीर देशपांडे यांनी लिहिलेल्या 'कोरोनाशी भिडताना' या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘ कोरोनाने काही वर्षांपूर्वी जगभर थैमान घातले. समीर देशपांडे यांनी त्यांच्या 'कोरोनाशी भिडताना' पुस्तकातून हा काळ पुन्हा उभा केला असून या महामारीचे उत्तम डॅाक्युमेंटेशन यानिमित्ताने झाले आहे.’खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोरोनामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. उद्याची चिंता न करता आजचा दिवस जगला पाहिजे ही मानसिकता कोरोनाने शिकवली. आमदार विनय कोरे म्हणाले, कोरोना काळात जीवाची पर्वा न करता भीतीचा हा सगळा प्रवास माणसाने अनुभवला. त्याचे उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन या पुस्तकामुळे झाले आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, कोरोनाने कठीण काळात भविष्यात येणाऱ्या संकटाशी कशाप्रकारे लढले पाहिजे याची जाणीव करुन दिली. पत्रकार समीर देशपांडे यांनी प्रास्ताविकामध्ये कोरोनाकाळातील घुसमट, सर्वसामान्यांच्या अडचणी, उपचारावरील मर्यादा आणि शासकीय यंत्रणेच्या कामाचा आढावा घेतला. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिल्पा खोत, आमदार अशोकराव माने, लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, मकरंद देशमुख, अक्षर दालनचे प्रकाशक रवींद्रनाथ जोशी, अमेय जोशी, संजीवनी देशपांडे, स्मिता देशपांडे, कॅप्टन वैभव देशपांडे, प्रणव देशपांडे उपस्थित होते. शिक्षक संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.
…………….
कोरोना योध्यांच्या सत्कार
कोरोना काळातील अतुलनीय कामगिरीबद्दल यावेळी डाॅ. डी.वाय. पाटील ग्रुपचे प्रमुख संजय डी. पाटील यांचा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. माजी आमदार राजेश पाटील, कोरोना योद्धा जाफरबाबा, वासीम चाबुकस्वार, राजू मेवेकरी, बंटी सावंत, अशोक रोकडे, दीपा शिपूरकर, छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ, पुस्तकाचे रचनाकार गौरीश सोनार, आजऱ्याचे नगरसेवक परेश पोतदार, पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.