शेतकरी संघाचा खत कारखाना सुरू होणार, अध्यक्षांची अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत चर्चा
schedule07 May 25 person by visibility 71 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचा खत कारखाना पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. संघाचे अध्यक्ष प्रा. बाबासाहेब शिंदे यांनी बुधवारी (७ मे २०२५) खत कारखान्याला भेट दिली. खत कारखाना सुरू करण्यासंबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. खत निर्मितीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष म्हणून प्रा. शिंदे यांची सोमवारी (पाच मे) निवड झाली. मंगळवारी त्यांनी कामकाजाला सुरुवात करत अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. साडेतीन तासहून अधिक काळ त्यांनी विविध विभागांची माहिती घेतली. संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. अध्यक्ष म्हणून कारभार हाती घेताना प्रा. शिंदे यांनी शेतकरी संघाच्या कामकाजासाठी पूर्ण वेळ देणार असल्याचे सांगत साऱ्यांना आश्वस्त केले. बुधवारी, त्यांनी रुकडी येथील खत कारखानास्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत संचालक राजसिंह शेळके होते. खत कारखान्याचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यासंबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. आवश्यक त्या घटकांची पूर्तता केली जाईल असे स्पष्ट केले.अध्यक्ष शिंदे यांनी पुढाकार घेतल्यामुळे शेतकरी संघाच्या खत कारखान्यातील उत्पादन पुन्हा सुरू होणार आहे. गुरुवारपासून (८ मे) खत कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे.