हसन मुश्रीफ-सतेज पाटील म्हणजे राम-हनुमानाची जोडी : गोकुळच्या कार्यक्रमात अरुण डोंगळेंचे प्रशंसोद्गगार
schedule30 Mar 25 person by visibility 263 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गोकुळ म्हणजे गुणवत्ता आणि दर्जेदार चव असे समीरकण बनले आहे. गोकुळची वार्षिक उलाढाल ४५०० कोटीपर्यंत पोहोचली आहे. दूध उत्पादकांचे कष्ट, संचालकांची साथ, कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट काम या बळावर गोकुळ दूध संघाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. गोकुळ आता नवीन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. मुश्रीफ आणि सतेज पाटील म्हणजे राम-हनुमानाची जोडी आहे. या दोघांनी गोकुळच्या वाटचालीत एकत्र राहावे.’असे उद्गगार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी काढले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरी शुभारंभ आणि दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांना बक्षीस वितरण असा संयुक्त समारंभ गुढीपाडव्याच्या दिनी आयोजित केला होता. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प येथे हा कार्यक्रम झाला. खासदार शाहू महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात शंभरहून अधिक जणांचा सत्कार करण्यात आला. आमदार चंदद्रीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अन्य संचालकांची प्रमुख उपस्थित होती.
या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना गोकुळचे चेअरमन डोंगळे यांनी, गोकुळच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सोलर प्रकल्प, नव्याने सुरू केलेला पेट्रोल पंप म्हणजे गोकुळ आता नवनवीन क्षेत्रात दमदार पाऊल टाकत असल्याचे द्योतक आहे. भविष्यात अनेक क्षेत्रात काम करायचे गोकुळचे नियोजन आहे. सहकारात पक्षीय राजकारण नसते. गोकुळचा कार्यक्रम हा पक्षविरहित आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार विनय कोरे यांनाही निमंत्रित केल होते. मात्र कोरे यांनी मी दुबईत आहे, यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही असे कळविले तर पालकमंत्री आबिटकर हे मतदारसंघातील कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येऊ शकत नाही असे सांगितल्याचे चेअरमन डोंगळे यांनी निदर्शनास आणले.
‘कोणतीही धोरणे ही वातानुकूलित खोलीत बसून यशस्वी होत नाहीत. तर शेतकऱ्यांना भेटून, दूध उत्पादकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करुन यशस्वी धोरणे राबवायची असतात. गोकुळ चेअरमन शेतकऱ्यांच्या दारी हा उपक्रम यशस्वी ठरला. ’असेही डोंगळे म्हणाले. मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. मंत्री यांचा तिथीनुसार वाढदिवस हा रामनवमीला असतो. तर सतेज पाटील यांचा वाढदिवस हा बारा एप्रिल रोजी आहे. त्यादिनी हनुमान जयंती आहे. मुश्रीफ आणि सतेज पाटील हे दोघेही राम-हनुमानाची जोडी असल्यासारखी आहे.’