गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड ठरावा – मंत्री हसन मुश्रीफ
schedule06 Dec 25 person by visibility 14 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘गोकुळने गुणवत्तेच्या जोरावर साधलेली प्रगती ही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक, वितरक आणि संघातील कर्मचाऱ्यांच्या निष्ठा व कष्टांचे फलित आहे. शेतकऱ्यांनी दूध उत्पादन वाढवले आणि गोकुळने त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्यामुळे गोकुळ आज राज्यातील अग्रगण्य व विश्वासार्ह दुग्ध ब्रँड ठरला आहे. नजीकच्या काळात गोकुळ हा राज्यातील दुधाचा अधिकृत ब्रँड ठरावा.’असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वाशी शाखा (नवी मुंबई) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानने उभारण्यात आलेल्या ‘१५ मे.टन क्षमतेच्या नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे’ उद्घाटन शनिवारी, सहा डिसेंबर रोजी झाले. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला.
मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ हा परंपरा, गुणवत्ता आणि विश्वासाचा प्रतीक आहे. त्याला राज्याचा अधिकृत ब्रँड घोषित केल्यास तो राज्यभर अधिक उजळून निघेल.” गोकुळची दीर्घ परंपरा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग, आधुनिक उत्पादन सुविधा आणि व्यापक ग्राहकवर्ग यांच्या आधारे गोकुळला राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे आहे. आमदार पाटील म्हणाले, “गोकुळ हा केवळ दुग्धव्यवसायिकांचा ब्रँड नसून लाखो दूध उत्पादक शेतकरी, वितरक, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या कष्ट, विश्वास आणि सहकार्याचा परिणाम आहे. गेल्या ४० ते ५० वर्षांत ‘लिक्विड मिल्क’ विभागात गोकुळने निर्माण केलेला विश्वास आज दुग्धजन्य प्रदार्थ क्षेत्रातही विस्तारत आहे.’ चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, हा दही प्रकल्प गोकुळच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. सहा कोटी रुपयांत उभारलेल्या या अत्याधुनिक प्रकल्पाची उत्पादन क्षमता १५ मेट्रिक टनांपर्यंत असून या प्रकल्पातून दरमहा जवळपास २५ लाख रुपयांची बचत होणार असल्याने गोकुळच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वागतपर भाषणात संचालक विश्वास पाटील म्हणाले दही प्रकल्प गोकुळच्या ब्रँड मजबुतीचा नवा टप्पा आहे. दूध उत्पादकांचा विश्वास हे आमचे भांडवल असून, गोकुळच्या प्रत्येक प्रकल्पामागील प्रेरणा हा शेतकरीच आहे.
संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले. संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, उपस्थित होते.