गोकुळच्या माजी चेअरमनांची टोलेबाजी ! जुळे भाऊपासून बापापर्यंत उपमा, जिल्ह्यातील नेत्यांचाही चिमटा ! !
schedule02 Jul 26 person by visibility 72 categoryउद्योग
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन: विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे, गोकुळमधील दोन वजनदार संचालक. सत्ता माजी महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील असो की मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या आघाडीची. मात्र गोकुळमध्ये या दोन संचालकांचा वरचष्मा कायम राहिला. वर्षानुवर्षे गोकुळमध्ये संचालक व अध्यक्षपद भूषविल्याने या दोन संचालकांना मानणारा दूध उत्पादकांचा वर्ग मोठा आहे. यामुळे त्यांच्या भूमिकेला महत्व. आणि त्याचे मोलही त्या दोघांना माहित. गेल्या निवडणुकीत ते महाविकास आघाडीत होते तर यंदा महायुतीमध्ये आहेत. गोकुळच्या राजकारणात गेली काही वर्षे केंद्रस्थानी राहिलेल्या या दोन संचालकांनी बुधवारी, एक जुलै २०२६ रोजी ठराव दाखल केले. मुहूर्त पाहून ठराव साधताना त्यांनी गोकुळचे राजकारण, महायुती व महाविकास आघाडीतील संघर्ष, ठराव दाखल करण्यावरुन नेतेमंडळीतील कुरघोडीवरुन टोलेबाजी करताना जिल्ह्यातील नेतेमंडळींचाही चिमटा काढला. तो जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्यासाठी एक जुलै २०२६ पर्यंत मुदत होती. एक जुलै हा कृषी दिन. नेमका हा योग साधत गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ आदींनी ठराव दाखल केले. गोकुळचे माजी संचालक बाळासाहेब खाडे, अजित नरके, वीरेंद्र मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळच्या तीन माजी चेअरमन यांनी एकत्रित येऊन ठराव दाखल केल्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला. तसेच गोकुळवरुन गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडीवरुनही खुमासदार टिकाटिप्पणी या नेतेमंडळींकडून झाली. महायुतीमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १९७६ ठराव दाखल केल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी हा महायुतीमध्ये मोठा भाऊ असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी त्यावर, ‘ठराव कोणाचे कितीही असू दे, गोकुळच्या संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ असेल’असे विधान केले. महायुतीमधील या दोन नेतेमंडळीच्या विधानावरुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी टिकाटिप्पणी करताना, ‘महायुतीचे उमेदवार हे मुंबईत ठरतात. तर आमच्या समविचारी आघाडीचे उमेदवार हे स्थानिक पातळीवर ठरविले जातील’असा टोला लगावला होता.
अरुण डोंगळेचे विधान अन् नव्या वादाला तोंड
या साऱ्या घडामोडीवरही या दोन माजी चेअरमन यांनी भाष्य केले. अरुण डोंगळे म्हणाले, ‘मी पूर्वी काँग्रेसमध्ये काम केले आहे. उमेदवारीसाठी काय होते हे मला माहित आहे. जिल्ह्याचा निर्णय ऐकण्यासाठी अगदी दिल्लीपर्यंत जावे लागते.’असा टोला आमदार पाटील यांना लगाविला. माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी व भाजपमधील मोठा भाऊ कोण या विधानाविषयी विचारले. त्यावर पाटील यांनी मिश्किलपणे, ‘ते दोघे आवळीजावळी असतील, म्हणजे जुळेभाऊ. म्हणून ते दावा करत असावेत.’अशी टिप्पणी करताच उपस्थितामध्ये एकच हंशा पिकला. या दरम्यान अरुण डोंगळे यांनी, ‘गोकुळमध्ये विश्वास पाटील चाळीस वर्षाहून अधिक काळ गोकुळमध्ये सक्रिय आहेत. मी ही साडेतीन दशकाहून अधिक काळ गोकुळमध्ये कार्यरत आहोत. आता आमच्यासोबत नव्या पिढीतील नविद मुश्रीफ, अजित नरके आहेत. ते आम्हाला मुलासारखे. विश्वास पाटील आणि मी सिनीअर संचालक आहोत. आम्ही दोघे जिकडे, त्या पॅनेलचा विजय निश्चित. कारण विश्वास पाटील हे गोकुळचे बाप आहेत. गोकुळमध्ये गेल्या पाच वर्षात पहिले दोन वर्षे विश्वास पाटील, नंतर दोन वर्षे मी, तर गेले वर्षभर नविद मुश्रीफ चेअरमन राहिले. म्हणजे महायुतीचे नेतृत्व होते. ’असा टोलाही त्यांनी लगाविला. डोंगळे यांनी गोकुळचा बाप असा उल्लेख करत नेतेमंडळींनाही चपराक लगावली. त्यांनी, हे विधान नेमके कोणाला उद्देशून केले ? महायुतीच्या नेत्यांना उद्देशून केले की महाविकास आघाडीच्या नेत्यांना ? अश्ीी विचारणाा होऊ लागली आह.
…………….
शब्दप्रयोग योग्य आहे का ?
अरुण डोंगळे यांनी गोकुळचा बाप असा जो शब्दप्रयोग केला त्यावरुन वादाला तोंड फुटले आहे.कसबा बीड येथील आझाद हिंद क्रांती संघटनेचे संघटनाप्रमुख व पशुपालक मुकुंद पाटील यांनी, ‘गोकुळचा बाप हा शब्द प्रयोग योग्य आहे का याचे प्रत्येकाने चिंतन करावे. गोकुळ हा सहकाराचा, दूध उत्पादकांचा, कर्मचाऱ्यांचा व सर्वांचा बारमाही दुभता आर्थिक कल्याणाचा सक्षम ठेवींचाा श्रीमंत बाप आहे. त्याला राजकीय वृद्धाश्रम दाखवू नका. गोकुळ परिवारात स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर हेच बापस्थानी आहेत.’