गोकुळची ऐतिहासिक कामगिरी, साकारले प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलन !
schedule11 Jan 26 person by visibility 68 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने प्रतिदिन 20 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट 11 जानेवारी 2026 रोजी साध्य केले. गोकुळच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील दूध संकलनाचा हा ऐतिहासिक उच्चांक आहे. या कामगिरीवर बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी "दूध उत्पादकांचा विश्वास, सेवा-सुविधा व संघटित प्रयत्नांचे फलित आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
-७ जून २०२१ रोजी संचालक मंडळाने गोकुळ प्रकल्प येथे प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला होता. लाखो दूध उत्पादकांच्या सक्रीय सहभागामुळे तसेच संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे हा संकल्प आज पूर्णत्वास गेला असून, गोकुळच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वाधिक दूध संकलनाचा उच्चांक ठरला आहे. रविवारी 11 जानेवारी रोजी एकूण दूध संकलन २० लाख ०५ हजारपैकी म्हैस दूध १०.७३ लाख लिटर व गाय दूध ९.३२ लाख लिटर इतके दूध संकलन झाले आहे. चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार होणे हे गोकुळ दूध संघाच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृढ विश्वासाचे आणि उत्पादकाभिमुख, पारदर्शक कारभाराचे ठोस प्रतीक आहे.”
गोकुळ दूध संघाने स्थापनेपासूनच दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केले आहे. दूध उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी संघामार्फत जास्तीत जास्त दूध खरेदी दर, अंतिम दूध दर फरक, पशुवैद्यकीय सेवा, गुणवंतापूर्ण पशुखाद्य पुरवठा, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना तसेच विविध कल्याणकारी योजना, सेवा व सुविधा प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सेवा-सुविधांचा आणि पारदर्शक कारभाराचा थेट परिणाम म्हणून दूध उत्पादकांचा गोकुळ दूध संघावर असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे. दूध उत्पादकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून भविष्यात दूध उत्पादकांच्या सहकार्याने २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठण्याचा मानस आहे.” असे चेअरमन मुश्रीफ यांनी सांगितले.