आंदोलनावरुन आंदोलन, गोकुळ आवारातून कर्मचाऱ्यांनी केले वांगचूकांचे समर्थन, भाजपाचा जोरदार आक्षेप
schedule18 Jul 26 person by visibility 106 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नीट परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. बुधवारी गोकुळच्या आवारात कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला.‘
कर्मचाऱ्यांनी गोकुळच्या आवाराबाहेर जाऊन आंदोलन करायला हवे होते. गोकुळच्या आवारात सरकारविरोधी आंदोलन करायला कर्मचाऱ्यांना कोणी परवानगी दिली ? गोकुळ हे राजकारण विरहित असले पाहिजे. तेव्हा गोकुळ आवारात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी’अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी शनिवारी केली. ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात जाऊन आक्षेप नोंदविला. प्रशासकीय मंडळ व व्यवस्थापकीय संचालक कार्यालयात नसल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी खुर्चीला निवेदन चिकटवले.
नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचूक यांनी जंतरमंतर येथे आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी आंदोलन केले. गोकुळ कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन झाले. त्याला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेत शनिवारी ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयावर धडक दिली. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, हंबीरराव पाटील, भिकाजी जाधव, महेश चौगले, सरदार रानगे, जयवंत सुतार, एकनाथ पाटील, अनिल देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोकुळमधील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन जाब विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान याप्रसंगी प्रशासकीय मंडळातील अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित नव्हते.
……………………………….
“ गोकुळच्या परिसरात आंदोलन करणे योग्य नाही. आम्ही ही गोकुळला दूध पुरवठा करतो. गोकुळला दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक हे सर्वपक्षीय आहेत. यामुळे गोकुळच्या परिसरात राजकीय आंदोलने होऊ नयेत. गोकुळचे राजकीयकरण होऊ नये. गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी गोकुळ आवारात सरकारच्या विरोधात आंदोलन करू नये. त्यांनी गोकुळच्या आवाराबाहेर जाऊन आंदोलन करावे. शिवाय भाजपतर्फे आठ प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. त्याची उत्तरे मिळायला हवीत. अन्यथा प्रशासकीय मंडळाच्या विरोधात आंदोलन करू. ”
- नाथाजी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण