कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला जागतिक भरारीचे पंख! कोल्हापुरातील आयटी कंपन्या करणार अमेरिकेला सॉफ्टवेअरसह इतर सेवा निर्यात ! !
schedule17 Jul 26 person by visibility 38 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 'आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर'च्या (आयटीएके)अथक प्रयत्नांमुळे कोल्हापूरच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या इतिहासात शुक्रवार (१७ जुलै २०२६ ) हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. नवी दिल्ली येथील 'सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल'चे महासंचालक डॉ. अभय सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कोल्हापूर आयटी एक्सपोर्ट समिट २०२६' अत्यंत दिमाखात आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो आयटी व्यावसायिकांच्या प्रचंड उत्साहात पार पडले. या परिषदेत कोल्हापूरच्या आयटी उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी एका विशेष 'कोल्हापूर आयटी स्पेसिफिक एक्सपोर्ट प्लॅन'वर शिक्कामोर्तब करण्यात आले. हॉटेल मराठा रेसिडेन्सी येथे परिषद झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, 'आयटीएके'चे सचिव राहुल मेंच यांनी "कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला जागतिक पातळीवर नेण्याच्या प्रवासातील आजचा दिवस हा सर्वोच्च यशाचा आहे. भारत-अमेरिका व्यापार पोर्टलवर असलेली तांत्रिक त्रुटी 'आयटीएके'च्या लढ्यामुळे दूर झाली, ज्यामुळे आता देशभरातील आयटी कंपन्यांना अमेरिकेत अधिकृतपणे सॉफ्टवेअर निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे. हे केवळ कोल्हापूरचे नव्हे, तर देशाचे यश आहे. यापुढे पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या-मोठ्या आयटी कंपनीचा व्यवसाय जागतिक स्तरावर वाढावा, यासाठी 'आयटीएके' धोरणात्मक मार्गदर्शन आणि भक्कम शासकीय पाठबळ मिळवून देत राहील."या शब्दांत कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राचा प्रवास उलगडला.
'आयटीएके'चे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राची ताकद आणि येथील कंपन्यांची बौद्धिक क्षमता प्रभावीपणे मांडली. बँकिंग, ईआरपी, सायबर सिक्युरिटी, हेल्थकेअर आणि एव्हीजीसी यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कोल्हापूरच्या ५०० हून अधिक कंपन्या करत असलेले दर्जेदार काम त्यांनी उदाहरणांसहित स्पष्ट केले. 'आयटी हब' बनवण्यासाठी 'आयटीएके' संपूर्ण ताकदीने कटिबद्ध आहे. आजचे हे पाऊल भविष्यात कोल्हापूरच्या हजारो तरुणांसाठी जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण करेल असे सांगितले.
या परिषदेतील सर्वात मोठी घोषणा म्हणजे 'आयटीएके'च्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय धोरणात झालेला महत्त्वपूर्ण बदल. अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावास आणि वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाच्या वतीने https://indiausatrade.mea.gov.in/ हे अधिकृत पोर्टल चालवले जाते. या जागतिक पोर्टलवर भारतीय कंपन्यांना अमेरिकेतील कंपन्यांसोबत थेट व्यापार निर्यातदार म्हणून नोंद करणे बंधनकारक आहे. 'एसईपीसी' (SEPC) सोबत झालेल्या बैठकीत 'आयटीएकेचे सचिव राहुल मेंच यांनी तांत्रिक त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. याची तातडीने दखल घेत एसईपीसी'ने अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि भारत सरकारशी उच्चस्तरीय चर्चा केली. अवघ्या काही दिवसांत केंद्र सरकारने यावर मंजुरीचे शिक्कामोर्तब करत 'SEPC' चा समावेश या अधिकृत यादीत केला. या यशामुळे आता कोल्हापूर आणि संपूर्ण भारतातील 'SEPC' नोंदणीकृत आयटी कंपन्यांना अमेरिका-भारत व्यापार पोर्टलवर अधिकृतपणे नोंदणी करून अमेरिकेत थेट सॉफ्टवेअर व इतर सेवा निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
या परिषदेत 'एसईपीसी'चे महासंचालक डॉ. अभय सिन्हा यांनी भारतीय सेवा निर्यातीचे विश्लेषण केले. ते म्हणाले, ‘सध्या भारताच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ४८ टक्के वाटा हा एकट्या सेवा क्षेत्राचा आहे. कोल्हापूरच्या आयटी उद्योजक व कंपन्यांची तांत्रिक क्षमता पाहता, हे शहर भविष्यात देशातील निर्यातीचे मुख्य केंद्र बनू शकते. . एसईपीसीचे प्रादेशिक संचालक विवेक बक्षी आणि ईवायचे वरिष्ठ सल्लागार श्रीजीत नायर यांनी शंकेचे निरसन केले. कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 'आयटीएके'चे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे यांनी या समिटमधील चर्चेच आढावा घेतला. परिषदेच्या यशस्वितेसाठी धवल चौगुले, मंदार पेटकर, ए. एम. पाटील, प्रसन्न कुलकर्णी, विश्वजित देसाई आदींनी परिश्रम घेतले.