बदलीसाठी खोटी प्रमाणपत्रे ! कागल-पन्हाळा-शिरोळ-राधानगरीतील शिक्षकांचा समावेश !!
schedule03 Nov 25 person by visibility 71 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी दिव्यांग व आजारपणाची खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या १८ शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून सोमवारपासून (३ नोव्हेंबर २०२५) कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात झाली. तीन व चार नोव्हेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत संबंधित शिक्षकांना या नोटिसा प्राप्त होतील. खोटी प्रमाणपत्रे सादर केली म्हणून प्रशासकीय व कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये ? यासंबंधी सात दिवसात खुलासा सादर करावा असे नोटिसीत म्हटले आहे. ‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम’ला उपलब्ध माहितीनुसार खोटी प्रमाणपत्रे सादर करणारे १८ शिक्षक आठ तालुक्यातील आहेत. कागल-पन्हाळा-शिरोळ-राधानगरीतील शिक्षक आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या संवर्ग एक शिक्षकमधील काही शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याच्या तक्रारी झाल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये २६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष आढळले. त्यापैकी चार जण मयत आहेत. तर चार शिक्षकांना निलंबित केले आहे. उर्वरित १८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटिस काढली आहे. नोटिस काढण्यात आलेले शिक्षक जिल्ह्यातील विविध भागातील आहेत. उपलब्ध माहितीनुसार पन्हाळा तालुक्यातील तीन शिक्षकांना, शिरोळ तालुक्यातील तीन शिक्षकांना, करवीर तालुक्यातील तीन व राधानगरी तालुक्यातील तीन शिक्षक व कागल तालुक्याीतल तीन शिक्षकांना कारणे दाखवा नोटिस काढली आहे. याशिवाय भुदरगड, हातकणंगले व चंदगड तालुक्यातील प्रत्येकी एक शिक्षक आहे. संबंधित शिक्षकांनी खुलासा सादर केल्यावर त्यांच्यावर कारवाईचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासन घेणार आहे.
……………..
४२ शिक्षक कोर्टात
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या बदली प्रक्रियेवर आक्षेप घेत ४२ शिक्षकांनी कायदेशीर दाद मागितली आहे. सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. दरम्यान सोयीच्या ठिकाणी बदली व्हाव्यात म्हणून सादर केलेल्या वीस हून अधिक शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये होणार आहे. त्या हॉस्पिटलकडे पडताळणीसाठी प्रमाणपत्रे पाठविली आहेत.