कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू - प्रचारप्रमुख श्रीराम साळुंखे
schedule02 Nov 25 person by visibility 124 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यामध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. बापूजींच्या विचारांचा वसा आणि वारसा लाभलेल्या कौस्तुभ गावडे यांना पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातून शिक्षक आमदार म्हणून विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू. शिक्षकांच्या सर्वांगीण प्रश्नांची जाण असणारा आपला हक्काचा माणूस विधानपरिषदेवर पाठविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याने, शिक्षकाने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे,’असे कोल्हापूर विभागप्रमुख व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ प्रचारप्रमुख श्रीराम साळुंखे यांनी केले.
पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणीसाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सहविचार सभेत बोलत होते. या सहविचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते. अध्यक्षस्थानांवरुन बोलताना प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, ‘स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने आतापर्यंत तीनवेळा शिक्षक आमदार निवडून दिले आहेत. आजच्या बदलत्या शिक्षणप्रवाहात शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा शिक्षक आमदार विधान परिषदेत पाठविणे गरजेचे आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा अंगीकार करून कौस्तुभ गावडे यांची जडणघडण सुरू आहे. त्यामुळे सहा नोव्हेंबर, २०२५ पर्यंत शिक्षक मतदार नोंदणी सुरू असून या काळात जास्तीत जास्त शिक्षक मतदार नोंदणी करावी आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे.’
या सहविचार सभेमध्ये पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणीचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख भूपाल कुंभार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या एकूण शिक्षक मतदार नोंदणीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे इच्छुक उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी जुनी पेन्शन योजना, संचमान्यता, टप्पा अनुदान, पवित्र प्रणाली, शिक्षक पात्रता परीक्षा सक्ती आणि वेतनेत्तर अनुदान यासारख्या विषयावर शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन दिले.