काँग्रेसचा लोकसहभागातून जाहीरनामा… महिला, विद्यार्थ्यांना मोफत केएमटी प्रवास ! लोकांना विश्वासात घेऊन हद्दवाढ !!
schedule07 Jan 26 person by visibility 134 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस पक्षाने लोकसहभागातून जाहीरनामा प्रकाशित केला. महिला मतदारांना आकर्षित करुन घेण्यासाठी त्यांच्यावर विविध योजनांचा वर्षाव केला आहे. विशेषकरुन महिला व शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना केएमटीचा मोफत प्रवास, महिलांना आरोग्य कवच, स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे, नोकरदार महिला व विद्यार्थिनीसाठी पिंक बस सेवा, महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ याबाबी आहेत. भ्रष्टाचारमुक्त कारभार,आवश्यक सेवा घरपोच, कोल्हापू सिस्टर सिटी, घरगुती गॅस पाइपलाइनची घोषणा केली. याप्रसंग बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी, ‘ सुनियोजित विकासासाठी कोल्हापूर शहराची हद्दवाढ गरजेची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेत राज्य सरकारकडे सकारात्मक पाठपुरावा करुन हा प्रश्न मार्गी लावणार असे सांगितले.
खासदार शाहू महाराज व आमदार पाटील यांच्या हस्ते भवानी मंडप परिसरात बुधवारी, सात जानेवारी २०२६ रोजी जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, बाळासाहेब सरनाईक, सरला पाटील, आनंद माने, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी , स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर, माजी महापौर कांचन कवाळे, शोभा बोंद्रे, वंदना बुचडे, अश्विनी रामाणे, माजी नगरसेविका भारती पोवार, भरत रसाळे, तौफिक मुलाणी यांच्यासह काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रकाशित झाला.
आमदार पाटील म्हणाले, ‘लोकांच्या सूचना विचारात घेऊन जाहीरनामा प्रकाशित केला आहे. येत्या पाच वर्षात या जाहीरनामामध्ये घोषित योजना अंमलात आणू. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितासाठी ज्या योजना आहेत, त्यासाठी निधी मंजूर करावा लागतो. आम्ही तो निधी आणू. यामुळे महायुती नेतेमंडळीच्या निधी कोठून आणणार ? या विधानाला काही अर्थ नाही. जाहीरनामामधील ठळक वैशिष्ट्ये सांगताना आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर शहरात दोन लाख ६० हजर महिलांच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक तपासणी केंद्रे सुरु करू. डोळे, दात, कान- नाक - घसा, थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह आणि अॅनिमियाची मोफत चाचणी केली जाईल. मिशन मोडवर महिलासाठी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे उभारु. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी शहरात दहा ठिकाणी आधुनिक पाळणाघरे सुरू केली जातील.’
महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट शाळा करु, डिजीटल अभ्यासिका, शाळांमध्ये पौष्टिक आहार, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महापौर गुणवत्ता शिष्यवृत्ती सुरु असे त्यांनी सांगितले. यूपीएससी व एमपीएससीसह स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाकरिता छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर प्रस्तावित आहे.अचानक उद्भवलेल्या अति गंभीर आजारावरील उपचारासाठी तातडीने महापालिकेकडून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करणारी योजना जाहीर केली.महापालिका रुग्णालयांचे आधुनिकीकरण, नवीन रुग्णवाहिका, रोजगार निर्मितीसाटी कोल्हापूर इनोव्हेशन हब, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ शहर, कला व संकृतीला प्रोत्साहन, विरंगुळा केंद्र सुरू करणार असल्याचे म्हटलल. शहरातील पायाभूत सुविधांचा अंतर्भाव केला आहे. उत्तम दर्जाचे रस्ते, महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत, सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे, उद्यानांचा कायापालट, शहरांगर्तत उडडाणपूल, चोवीस तास पाणी या सुविधा देऊ असे म्हटले.
…………….
‘कोल्हापूर शहराच्या विकासाचा सर्वसमावेशक जाहीरनामा केला आहे. सगळया घटकांना न्याय दिला आहे. या जाहीरनाम्यातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल. त्याद्वारे नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ. पारदर्शक कारभाराद्वारे महाविकास आघाडीचे उमेदवार या योजनांच्या पूर्ततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करतील.’
- खासदार शाहू महाराज