विधानसभेला कागल-चंदगडमध्ये काँग्रेसने मदत केली नाही : शरद पवार गटाचा थेट आरोप ! व्ही. बी, आरकेंचें मुश्रीफांवर टीकास्त्र !!
schedule26 Mar 25 person by visibility 225 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कागल, चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना मदत केली नाही.काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी कागलमध्ये सभा घेतली नाही. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचे हेलिकॉप्टर कागल आणि चंदगड मध्ये उतरले नाही. चंदगडमध्ये अप्पी पाटील यांना निवडणुकीतून माघार घ्यायला सांगायला हवे होते. गोपाळराव पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नंदा बाभूळकर यांना मदत करायला पाहिजे होते. मात्र या गोष्टी झाल्या नाहीत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतलबी कारभारामुळेच गडहिंग्लज कारखाना संपला, तालुका संघ, मार्केट कमिटी मोडकळीस आला. मुश्रीफांचा कारभार हा व्यक्तीकेंद्रित आहे.’अशी जोरदार टीका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी खोत यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांचा मेळावा बुधवारी झाली. साईक्स एक्स्टेंशन येथील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सभागृहात हा मेळावा झाला. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष पाटील यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना विधानसभा निवडणुकीतील घडामोडीसंबंधी काँग्रेस पक्षाकडे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ताकतीने लढविल्या जातील. यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा एक नंबरचा पक्ष असेल. इतके चांगले संघटन आपले आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्या पाठीशी आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्हाला बळ द्यावे. निवडणुका ताकतीने लढवू. ’ भाषणात जिल्हाध्यक्ष पाटील यांनीही मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केली. शहराध्यक्ष आर. के.पोवार यांनी थेट नाव न घेता मंत्री मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. ‘राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना काही मंडळी माझा विठठृल म्हणून संबोधायचे. मात्र पक्षाने सगळे काही देऊनही त्याच मंडळींनी शरद पवार यांची साथ सोडली. ‘असा टोला पोवार यांनी लगाविला. कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनीही विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून मदत झाली नसल्याचे स्पष्टच सांगितले.
याप्रसंगी समरजितसिंह घाटगे, , शिरोळ तालुकाध्यक्ष विक्रम जगदाळे, हातकणंगले तालुकाध्यक्ष धनाजी करवते, भुदरगड तालुकाध्यक्ष धनराज चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बी. के. चव्हाण, करवीर तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, गगनबावडा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, रामराजे कुपेकर, अमर चव्हाण, बी. के. डोंगळे, रावसाहेब भिलवडे, रोहित पाटील, महिला आघाडीच्या अश्विनी माने, पद्मा तिवले यांची भाषणे झाली. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस सुनील देसाई यांनी आभार मानले. याप्रसंगी बाजीराव खाडे, नितीन पाटील, महादेव पाटील, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते.