फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. पद्मा रेखा जिरगे
schedule05 Jan 25 person by visibility 721 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित प्रसुती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा रेखा जिरगे यांची फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्या, पुढील दोन वर्ष या पदाचा कार्यभार सांभाळतील. डॉ. जिरगे या उजळाईवाडी येथील श्रेयस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयूट व सुश्रृत आयव्हीएफ क्लिनिकच्या संस्थापक आहेत.
बेंगलोर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. डॉ. पद्मा रेखा जिरगे यांनी यापूर्वी या सोसायटीच्या ऑनररी सेक्रेटरी तसेच व्हाईस प्रेसिडेंट या पदांवर काम केले आहे. २०१४ मध्ये प्रजनन तंत्राद्वारे कर्करोग पीडित रुग्णांच्या पुनरुत्पादक समस्यांचे निराकरण करण्यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. प्रजनन क्षमता संरक्षण प्रक्रिया अंतर्गत स्त्री बीजांड गोठवणे, शुक्राणू बँकिंग, भ्रूण फ्रिजिंग आणि गर्भाशयमुख व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. या सोसायटीची व्यापकता केवळ भारतातच नव्हे तर सर्व आशियायी देश आणि जगभरात पसरली आहे.
अध्यक्षपदाच्या कार्यकालादरम्यान या संस्थेअंतर्गत असणाऱ्या सेवा पोहचविण्यात जे अडथळे येतात ते दूर करण्यासाठी विशेष प्रयत्नशील असतील. वंध्यत्वासारख्या दुष्परिणांना टाळण्यासाठी व कॅन्सरमधील उपचारामध्ये काही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुढील दोन वर्षात डॉ. जिरगे यांचे मार्गदर्शन उपयुक्त राहील.