बोलवाड शाळेत पुस्तकांची गुढी, विद्यार्थ्यांचे वही देऊन स्वागत
schedule31 Mar 25 person by visibility 96 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मिरज तालुक्यातील बोलवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया झाली. विद्यार्थ्यांचे फूल, चॉकलेट व वही देऊन स्वागत केले. शाळेमध्ये पाठ्यक्रमाची पुस्तके रचून पुस्तकांची गुढी तयार केली. पालक व विद्यार्थ्यांसाठी ही गुढी आकर्षणाचे कारण ठरली.
मुलांना खाजगी शाळेकडे न पाठवता जिल्हा परिषद शाळेमध्येच पाठवा यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक आपल्या शाळेची जाहिरात करताना दिसत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाची गुढी उंच करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात असून त्यापैकी एक उपक्रम म्हणजे गुढीपाडव्या दिवशी इयत्ता पहिलीच्या मुलांना प्रवेश देणे व आत्तापासूनच इयत्ता पहिलीच्या वर्गात बसवून घेऊन त्यांचे वर्ग सुरू करणे. हा उपक्रम जिल्हा परिषद शाळा बोलवाड येथेही राबविला. एकूण २८ दाखल पात्र मुलांपैकी गुढीपाडव्या दिवशीच बारा विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतला.
बोलवाडच्या सरपंच निगार शेख, उपसरपंच सचिन कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण सर्वदे, मुख्याध्यापक माने यांनी पालकांचे आभार मानले. यावेळी परशुराम सलगरे, संतोष ढोले,सविता डांगे, शुभांगी पाटील, बाबासाहेब कणके उपस्थित होते.