गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी बायोगॅस योजना
schedule11 Nov 22 person by visibility 1945 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : एन.डी.डी.बी (मृदा),कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व सिस्टीमा कंपनी यांचे संयुक्त सहकार्यातून गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी कार्बन क्रेडीट योजने अंतर्गत ५००० बायोगॅस प्लांट ची उभारणी करण्यात येणार आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली आहे.
कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेचे मुख्य उद्देश, दूध उत्पादक महिलांना, धुर धूळ विरहीत इंधन घरच्या घरी तयार करता यावे. शेण वाहून नेणे, शेणी लावणे या कामातून महिलांना सुटका मिळावी व गॅस सिलेंडरच्या खर्चात बचत व्हावी,स्लरीच्या माध्यमातून सेंद्रिय खत शेतीला मिळावे. सरपणासाठी वृक्षतोड होवू न देता नैसर्गिक समतोल राखणेसाठी व जंगले अबाधित राहावीत. परिसरातील हवा स्वच्छ, शुद्ध रहावी व त्याचा चांगला परिणाम दुध उत्पादकांच्या कुटूंबावर होवून त्यांचे आरोग्य चांगले रहावे या हेतूने कार्बन क्रेडीत बायोगॅस योजना गोकुळकडून राबविण्यात येणार आहे अशी माहिती चेअरमन पाटील यांनी दिली.कार्बन क्रेडीट योजना २०२३ अखेर गोकुळ दूध संघ महिला दूध उत्पादकांसाठी राबवित आहे. यामध्ये २ घन मी., २.५ घन मी., ३ घन मी., ४ घन मी. ५ घन मी. पर्यंत क्षमतेचे बायोगॅस उपलब्ध असणार आहेत. या बायोगॅसच्या मेंटेनन्स सिस्टीमा कंपनी १० वर्ष पाहणार आहे.
२ घन मी. चा बायोगॅससाठी ४५ ते ५० किलो दररोज शेण उपलब्ध होणे गरजेचे आहे. २.५ घन मी.च्या बायोगॅस प्लान्टसाठी ६० ते ६५ किलो शेण उपलब्ध होणे गरजेचे आहे.
२ घन मी.च्या बायोगॅस प्लान्ट ची किमंत ४१,२६० रुपये इतकी असून गोकुळच्या दूध उत्पादक कुटुंबाला सदर बायोगॅस प्लान्ट ५,९९० रुपये इतक्या कमी रक्कमेमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. २.५ घन मी. च्या प्लान्ट ची किमंत ४९,५०० रुपये इतकी असून सदर बायोगॅस प्लान्ट १०,४९० रुपये इतक्या किमंतीस उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये बायोगॅस प्लान्ट उभारणीसह डबल बर्नर गॅस स्टोव्ह (शेगडी) हि दिला जाणार आहे.
या योजनेसाठी दूध उत्पादकांकडे २ ते ३ जनावरे असावीत. दूध उत्पादकांनी दूध कायमस्वरूपी गोकुळच्या प्राथमिक दूध संस्थाकडे पुरविले पाहिजे. दूध उत्पादक कुटुंबाने १२ फुट बाय १२ फुट इतकी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ज्या दूध उत्पादकांना कार्बन क्रेडीट बायोगॅस योजने अंतर्गत सहभागी व्हायचे आहे. त्यांनीज्ञआपल्या प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून नावे संघाकडे नोंद करावयाची आहेत. योजनेच्या लाभार्थी यांना बायोगॅस मागणी नुसार / उपलब्धते नुसार देणार आहोत. कार्बन क्रेडीट बायोगॅस योजने अंतर्गत ४१,२६०रुपये किंमतीचे २ घन मी. क्षमतेचे बायोगॅस ५,९९० रुपये इतक्या किंमतीमध्ये दूध उत्पादक कुटुंबाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रतीलाभार्थी ३५,२७० रु.अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत गोकुळच्या महिला दूध उत्पादकांना१७ कोटी ६३ लाख ५० हजार इतक्या रक्कमेचा फायदा मिळणार आहे. असा एकूण २० कोटी ६३ लाख किमंतीचा कार्बन क्रेडीट बायोगॅस प्रोजेक्ट २०२३ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती प्राथमिक दूध संस्थाना परिपत्रकाद्वारे कळविण्यात येणार आहे.तरी इच्छुक दूध उत्पादकांनी लवकरात लवकर संबधित दूध संस्थेमध्ये नाव नोदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन पाटील यांनी केले आहे.
यावेळी जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत, संपदा थोरात, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.
..........
बायोगॅस योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क -१)
नीता कामत – महिला नेतृत्व विकास अधिकारी गोकुळ –९८२३१७५७७२.
२ ) संपदा थोरात - महिला नेतृत्व विकास अधिकारी गोकुळ – ९८२३९३९५१२.