कुलगुरुविना विद्यापीठ ! प्रभारीसाठी इतका गोंधळ, पूर्णवेळ नियुक्तीला काय स्थिती !!
schedule07 Oct 25 person by visibility 1087 categoryशैक्षणिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : मात्र विद्यापीठ म्हटलं की कुलगुरू असे जणू समीकरण. मात्र धक्कादायक म्हणजे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ चक्क कुलगुरुविना आहे. राजभवन कार्यालयाकडून प्रभारी कुलगुरुपदाची प्रक्रिया एकतर मुदतीत झाली नाही आणि दुसरे म्हणजे नियमित कुलगुरुंच्या पदाचा कार्यकाल संपून चोवीस तास उलटले तरी नव्याने कोणाकडे प्रभारी कार्यभार सोपविला नाही. यावरुन उच्च शिक्षण क्षेत्रात, विद्यापीठाच्या कुलगरू नियुक्तीतही लेटलतिफ कारभार सध्या चर्चेचा ठरला आहे. मंगळवारी दिवसभर कुलपती कार्यालयाकडे साऱ्यांच्या नजरा होत्या.
‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’या उक्तीची प्रचिती सर्वसामान्यांना नागरिकांना नवीन नाही. मात्र कुलगुरू निवड प्रक्रियेत चक्क राजभवन कार्यालयाकडून होत असलेली दिरंगाई हा धक्कादायक मानला जात आहे. कोणत्याही विद्यापीठातील कुलगुरू हे सर्वोच्च पद. कुलगुरू निवड प्रक्रिया, निश्चिती या साऱ्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरलेला असतो. कुलपती कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार सारी प्रक्रिया पार पडते. दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू शोध व प्रभारी कुलगुरुंची नियुक्ती मुदतीत झाली नाही. सहा ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. डी. टी. शिर्के यांच्या कुलगुरुपदाचा कार्यकाल संपला. नवीन कुलगुरू शोधाच्या अनुषंगाने मार्च २०२५ मध्ये कुलपती कार्यालयाने विद्यापीठाला पत्र पाठवून शोध समितीसाठी एका तज्ज्ञाची शिफारस करण्याविषयी कळविले. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने अधिकार मंडळाची मान्यता घेऊन शोध समितीसाठी एका तज्ज्ञाची शिफारस केली. मात्र सहा ऑक्टोबरपर्यंत कुलपती कार्यालयाकडून कुलगुरू निवडीसाठी समितीची स्थापना झाली नाही. समितीची स्थापना नसल्यामुळे कुलगुरुपदासाठी अर्ज मागविण्याची जाहिरातही प्रसिद्ध झाली नाही.
सहा ऑक्टोबर रोजी नियमित कुलगुरुंचा कार्यकाळ संपत असल्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत प्रभारी कुलगुरुंची नियुक्तीचा घोषणा होईल अशी शक्यता होती. शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या ६३ वर्षाच्या कालावधीत नियमित कुलगुरू पदावरुन बाजूला होत असताना प्रभारी कुलगुरुंनी आणि पूर्णवेळसाठी निवड झालेल्या कुलगुरुंनी कार्यभार स्विकारल्याचा इतिहास आहे. यंदा मात्र या दोन्ही गोष्टी बाजूला पडल्या. पूर्णवेळसाठी प्रक्रियेचा अवलंब नाही आणि प्रभारीची घोषणा रखडली अशी स्थिती आहे. कुलपती कार्यालयाकडून होत असलेला विलंब हा उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चेचा ठरला आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे कोल्हापूर, सांगली, सातारा अशा तीन जिल्हयाचे आहे. २८३ कॉलेजिअस संलग्नित आहेत. एक लाख ८५ हजार विद्यार्थी संख्या आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये पाच हजाराच्या आसपास विद्यार्थी संख्या आहे. कॅम्पसमधील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या सातशेहून अधिक आहे. कॉलेजस्तरावरील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या पटीत आहे. धोरणात्मक बाबीत कुलगुरुंची भूमिका, निर्णय महत्वाचे असतात. मात्र शिवाजी विद्यापीठ, सध्या कुलगुरुविना आहे. असा प्रसंग पहिल्यांदा निर्माण झाला आहे. चोवीस तास उलटले तरी प्रभाी कुलगुरू ठरत नाही. यावरुन प्रभारी कुलगुरुपदाच्या नियुक्तीवेळा अशी गोंधळाची स्थिती तर पूर्णवेळ नियुक्ती वेळी काय स्थिती असणार ? असा प्रश्न आता उच्च शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे.
.................
विद्यापीठात विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला
शिवाजी विद्यापीठ मुख्य इमारत परिसरात मंगळवारी मधमाशांनी विद्यार्थ्यावर हल्ला केला. ओके इमारतीच्या बाहेरील बाजूस लटकत असलेले मधमाशांचे पोळे तुटून खाली पडले. मधमाशांनी सुरक्षा कर्मचारी व विद्यार्थ्यावर हल्ला चढवला. यामध्ये अनेक जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान विद्यापीठात बाका प्रसंग निर्माण झाला तर जबाबदारी कोणावर ? निर्णय कोण घेणार ? असा प्रश्न यानिमित्ताने विचारले जात आहेत.