Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

२१ वर्षात २४ वेळा बदली ! तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी ! !

schedule31 Mar 26 person by visibility 225 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. ऑगस्ट २०२५ पासून दिव्यांग कल्याण कल्याण विभागाच्या सचिवपदी कार्यरत असलेल्या मुंढे यांची आठ महिन्यातच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. मुंढे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी माणिक गुरसळ यांची नियुक्ती झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागात काम करताना मुंढे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावरुन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला होता. मुंढे यांच्या २१ वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत २४ वेळा बदली झाली आहे. या कालावधीत त्यांचे प्रशासकीय कामकाजावरुन अनेकदा लोकप्रतिनिधीशी खटके उडाले आहेत.

तुकाराम मुंढे हे २००५ मधील आयएएस अधिकारी आहेत. सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात झली. धाडसी अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व सचिवपदी त्यांनी काम केले आहे. सप्टेंबर २००७ मध्ये देगलूर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. जानेवारी २००८ मध्ये त्यांच्याकडे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबादरी सोपाविली. मार्च २००९ मध्ये आदिवासी विभागााचे आयुक्त,  जुलै २००९ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. जून २०१० मध्ये कल्याण येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तर जून २०११ मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी झाले. सप्टेंबर २०१२ मध्ये विक्रीकर सहआयुक्त मुंबई तर नोव्हेंबर २०१४ मध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी बनले. मे २०१६ मध्ये नवी मुबई महापालिका आयुक्त, मार्च २०१७ मध्ये पीएमपीएल पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, फेब्रुवारी २०१८ मध्ये नाशिक महापालिका आयुक्त, नोव्हेंबर २०१८ मध्ये नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून त्यांची बदली झाली होती. डिसेंबर २०१८ मध्ये एडस नियंत्रण मुंबई प्रकल्प अधिकारी झाले.

जानेवारी २०२० मध्ये नागपूर महापालिका आयुक्त, ऑगस्ट २०२० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई येथे सदस्य सचिव झाले. जानेवारी २०२१ मध्येत्यांच्याकडे राष्ट्रीर्ंय मानवाधिकारी आयोगची जबाबदारी सोपविली. सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा एकदा त्यांची बदली झाली. त्यांच्याकडे आरोग्य सेवा व संचालक विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. एप्रिल २०२३ मध्ये पशुसंवर्धन व कृषी विभागाचे सचिव, जून २०२३ मध्ये मराठी भाष विभागाचे सचिव, जुलै २०२३ मध्ये कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सचिवपदी बदली झाली. जून २०२४ मध्ये असंघटित कामगार विभाग मुंबई येथे विकास आयुक्त तर ऑगस्ट २०२५ मध्ये दिव्यांग् कल्याण आयुक्त मंत्रालय येथे सचिवपदी बदली झाली होती. दिव्यांग कल्याण विभागात सचिव म्हणून काम करताना त्यांनी बोगस प्रमाणपत्रांचा छडा लावला. यामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes