मायेचा अखंड झरा माझा दादा....!
schedule31 Mar 26 person by visibility 486 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन : वरिष्ठ सनदी अधिकारी व मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी हे ३६ वर्षाच्या प्रशासकीय सेवेनंतर ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. विविध पदावर प्रभावी कामकाज करत प्रशासकीय क्षेत्रात वेगळा ठसा त्यांनी उमटविला. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन सचिव, आरोग्य सचिव ,सांस्कृतिक सचिव, माहिती व प्रसिद्धी महासंचालक , एमआयडीसी संचालक, सिडको संचालक, मुख्यमंत्र्यांचे सचिव व प्रधान सचिव म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून मार्च २०२४ मध्ये त्यांची नेमणूक झाली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या भगिनी प्रा.डॉ. कविता गगरानी यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. भूषण गगरानी यांची कर्तबगारी उलगडताना बहिण, भावाच्या नात्याचा वेगळा पैलू मनाला स्पर्शून जातो. बालपणापासूनचा हा आठवणींचा मेळा डॉ. कविता गगरानी यांच्या शब्दांत पुढीलप्रमाणे…
‘बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त या पदावरून डॉ भूषण गगराणी हे आज सेवानिवृत्त होत आहेत. तब्बल ३६ वर्षाची त्यांची प्रशासकीय कारकिर्द. त्यांनी प्रशासनाला मानवी चेहरा दिला. अत्यंत संयमी, विवेकी, शांत , मितभाषी, संवेदनशील तितकेच कठोर, धडाडीचे निर्णयक्षम आणि महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्धी पासून शेकडो मैल दूर असणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून डॉ भूषण गगराणी यांची ओळख आहे. आज मागे वळून पाहताना ते प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वीचा आणि नंतरचा कालखंड डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटांप्रमाणे तरळून गेला. अनेक प्रसंगानी मनात गर्दी केली. अगदी बालपणापासून मोठा भाऊ म्हणून सांभाळणारा, काळजी घेणारा दादा अशीच त्याची प्रतिमा माझ्या मनावर कोरली गेली आहे ती आजही अणि पुढेही कायम असेल हे निश्चित! एक लहान आणि एकुलती एक बहिण म्हणून दादाचा माझ्यावर प्रचंड जीव आहे.
प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी झाल्यावर त्याचे प्रेम आणि काळजी तसूभरही कमी झाली नाही हे विशेष. आई - वडील शिक्षक असल्याने घरात अभ्यास, वाचन, साहित्यिक, सांस्कृतिक बौद्धिक चर्चा अणि विशेषता वक्तृत्व स्पर्धेतील सहभाग अणि यश यामुळे अगदी लहानपणापासुन फारसे कळत नसले तरी दादाच्या सानिध्यात राहून चर्चा कानावर पडून पडून मला देखील त्या चर्चांमध्ये रस वाटू लागला. शाळेत मला सायकल वरुन डबल सीट नेणारा दादा आजही त्याच्याकडे गेल्यावर मी मुंबईहून घरी व्यवस्थित पोहोचले की नाही याची व्यस्त कामातून ही खात्री करून घेतो. मुंबईला एसआयएसी (SIAC) येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात असताना शिष्यवृत्तीचे पैसे साठवून माझ्या वाढदिवसाला मला ड्रेस घेणारा आजही पद, पैसा अणि प्रसिद्धी मिळाल्यावरही अजिबात बदलला नाही. त्याची स्पर्धा परीक्षा देण्याची सर्वांगीण तयारी सुरू होती. त्यात वडील मराठीचे शिक्षक असल्याने सतत विविध विषयावर चर्चा होत असत. दादा सकाळी पहाटे उठून पाणी भरून अभ्यासाला बसत असे. वैयक्तिक असो की व्यावसायिक जीवन असो जबाबदारीची जाणीव हा त्याच्या स्वभावाचा स्थायी भाव म्हणावा लागेल. तितक्याच तो विनोदी देखील आहे. घरातील अनेक तणावाच्या प्रसंगी गम्मत किंवा विनोदीशैलीने धीराने मार्ग काढणे हे देखील त्याचे एक स्वभाव वैशिष्ठ्य आहे.
कोल्हापूर हायस्कूल, देशभक्त रत्नपाआण्णा कुंभार कॉलेज ओफॉ कॉमर्स, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे येथून त्यांनी शालेय, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात अभ्यासाबरोबर वचन, वक्तृत्व , निबंध आणि एकांकिका स्पर्धा यामुळे त्याचा व्यासंग वाढतं गेला आणि प्रत्यक्ष गोष्ट सखोल अभ्यासपूर्ण करून पडताळणी करणे हे रुजत गेले. त्यामुळे वाणिज्य शाखा असतानाही त्याचा मराठी वाङमय आणि इतिहास विषयाचे आकलन जबरदस्त होते. त्याच्या इतिहास विषायाच्या विश्लेषणात्मक समजावून सांगण्यामुळे मला इतिहास विषयात गोडी निर्माण होवून इतिहासाची प्राध्यापिका होण्याचा प्रवास कदाचित त्याच्यामुळेच सुरू झाला. असो. त्या काळी म्हणजे ऐंशीच्या दशकात स्पर्धा परीक्षांच्या बाबत फारशी माहिती, जागृती अणि साधने नसताना या अवलियाने थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची तयारी केली. कठोर मेहनतीने १९९० मध्ये मराठी माध्यम घेवून भारतात तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला आला. मराठी व इतिहास हे दोन विषय त्यांनी घेतले होते. त्याने हा एक वस्तुपाठ घालून दिला. त्यानंतर सामान्य कुटुंबातून आलेला माझा भाऊ अनेकांचे प्रेरणास्थान ठरला आजही ठरत आहे. अगदी मसुरी येथील प्रशिक्षणा पासून ते आज बृहन्मुंबई आयुक्त म्हणून निवृत्त होईपर्यंतचा त्याचा प्रवास हा थक्क करणारा आहे. त्याची चंद्रपूर येथील प्रोबेशनपासून सुरू झालेली कारकीर्द क्रिडा, पर्यटन, सांस्कृतिक, माहिती प्रसिद्धी, उद्योग, आरोग्य सचिव जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांचा सचिव अणि आता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अशी ३६ वर्षांचा दीर्घ कालखंड असलेली अत्यंत यशस्वी कारकीर्द आहे.
प्रत्येक विभागात काम करताना नाविन्यपूर्ण योजना राबवण्याची हातोटी, वक्तशीरपणा, नेमकेपणा, निर्णयक्षमता अणि सामाजिक भान यामुळे प्रशासनाला मानवी चेहरा देण्यात तो यशस्वी झाला. कुटुंबातील सर्व नाती त्याने उत्तमरीतीने निभावली. एक भाऊ म्हणून तर माझ्या आयुष्यातील अनेक संकटात खंबीरपणे तो अणि वहिनी खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. माझ्या शैक्षणिक कारकिर्दीला सक्रिय प्रोत्साहन दिले. हे करताना मी स्वावलंबी होवून स्वाभिमानाने स्वतः ची ओळख निर्माण करावी यावर देखील त्याचे लक्ष्य असते. आम्ही पाठीशी आहोत पण तुझी लढाई तुलाच लढायची आहे असे सांगत त्याने मला दुबळे न होवू देता खंबीर बनवले. आजही जर कोणी माझी ओळख सांगितली तर तुझा भाऊ म्हणून मला ओळखतात याचा त्याला खूप आनंद होतो. अत्यंत संवेदनशील असणारा पण शब्दातून न बोलता कृतीतून व्यक्त होणारा माझा दादा जितका व्यावसायिक जीवनात खंबीर अणि धडाडीचा आहे तसाच वैयक्तिक जिवनात अत्यंत कुटुंबवस्त्ले आहे. त्याने विविध क्षेत्रातील त्याच्यावर प्रेम लागणारा मोठा मित्र परिवार देखील जोपासला आहे. माणसाने सतत नवनवीन शिकत राहिले पाहिजे असे कृतीने दाखवून त्याने एमएस, एमकॉम, एमबीए, एलएलबी,पीएचडी. या पदव्या प्रशासन सांभाळत मिळवल्या आहेत. सतत कार्यरत असले पाहिजे ही त्याची शिकवण आम्हाला सुदैव कार्यप्रवण ठेवते. आम्हा भावंडांतील हा भावबंध खर तर शब्दात व्यक्त करणे खूप अवघड आहे हे नाते शब्दा पलीकडले आहे. मल्टी टास्किंग (Multy tasking) असे हे संयमी, प्रेमळ आणि काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व मला दादा च्या रुपात मिळाले यापेक्षा अधिक भाग्य ते काय? दादा तुला आनंदी, उत्तम, निरोगी दीर्घायुष्य लाभो याकरिता ट्रकभर शुभेच्छा....!’