शंभर टक्के निधीसाठी जिप सदस्य भेटले मंत्र्यांना ! मंगळवारी मुंबईत आबिटकर -मुश्रीफांत चर्चा !!
schedule03 Aug 26 person by visibility 29 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला विविध विकासकामासाठी दिलेल्या निधी वाटपाचे अधिकार हे शंभर टक्के जिल्हा परिषद सदस्यांनाच असायला हवेत. यामध्ये आमदार व मंत्र्यांची भागिदारी नको यासाठी सदस्यांनी सोमवारी, तीन ऑगस्ट २०२६ रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत रात्री ही भेट झाली. यावेळी सदस्यांनी, निधीबाबत आग्रही भूमिका घेतली. यामध्ये कोणताही फॉर्म्युला नको. शंभर टक्के निधी सदस्यांनाचा मिळावा या मागणीचा पुनरुच्चार केला. याप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी फोनवर बोलले. या विषयासंबंधी मंगळवारी, चार ऑगस्ट रोजी मंत्रालयात दोघांत चर्चा करण्याचे ठरले.
जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला जवळपास २९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधी वाटपाचे अधिकार कोणाला हा सध्या कळीचा विषय ठरला आहे. आमदार व खासदारांना निधीचे विविध पर्याय आहेत. त्यांनी या निधी वाटपात हस्तक्षेप करू नये. जिल्हा परिषद सदस्यांना निधी कमी असतो. तेव्हा जिल्हा नियोजन समितीचा शंभर टक्के निधी मिळावा अशी सदस्यांची भूमिका आहे. जिल्हा नियोजनाच्या निधी वाटपात नवीन पायंडा पाडू नये असेही सदस्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे आमदारांना पन्नास टक्के व सदस्यांना पन्नास टक्के असा फॉर्म्युला चर्चिला जात आहे. मात्र हा फॉर्म्युला सदस्यांना मान्य नाही. ९० टक्के निधी सदस्यांना व दहा टक्के निधी आमदारांना या फॉर्म्युलाची चर्चा आहे. शिवाय सदस्यांना ७० टक्के व आमदारांना तीस टक्के निधी असा एक फॉर्म्युला आहे. मात्र या निधीमध्ये काटछाट नको. शंभर टक्के निधी जिल्हा परिषद सदस्यांनाच हवा यासाठी सह्यांची मोहिम राबविली आहे. ५० हून अधिक सदस्यांनी सह्या केल्या आहेत.
दरम्यान सोमवारी, सायंकाळी जिल्हा परिषदेतील सर्वपक्षीय सदस्यांनी मंत्री मुश्रीफ यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत भेट घेतली. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांचे पती शशिकांत खोत, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर यांचे पती बाबा नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल यादव यांचे पती प्रविण यादव, सदस्य एकनाथ पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, सागर धुंदरे, आतिश शिंगे, सुदर्शन खोत, अनिरुद्ध रेडेकर, संग्राम पाटील, विश्वनाथ पाटील, अमर पाटील, प्रकाश मुगडे आदींचा समावेश होता. त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सगळा निधी जिल्हा परिषद सदस्यांना द्या अशी मागणी केली. निवेदनही सादर केले.
………….
निधीसाठी पंचायत समिती सभापतीही सरसावले
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींनी एकत्र येत निधीसंबंधी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांना निवेदन दिले. जिल्हा परिषद सदस्यांइतकाच निधी पंचायत समिती सभापतींना तालुका स्तरावरील कामासाठी उपलब्ध करुन द्यावा. ग्रामीण भागात रस्ते, गटर दुरुस्ती, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शाळा दुरुस्ती, सार्वजनिक बांधकामे, समाजमंदिरे,अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती यासह मूलभूत सुविधासाठी निधी हवा, अशी मागणी त्यांनी केली. राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर. वाय. पाटील, भुदरगडचे सभापती विक्रमसिंह शामराव पाटील, करवीरचे सभापती साताप्पा धोंडीराम पाटील, कागल पंचायत समिती सभापती सुवर्णा शशिकांत पाटील, हातकणंगले पंचायत समिती सभापती अश्विनी अनिल बिरंजे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
………………