कामगार नेते कॉम्रेड बाबा यादव यांचे निधन
schedule12 Jul 26 person by visibility 34 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेतमजूर- कामगार, आरोग्य चळवळीतील लढाऊ नेते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. बाबासाहेब शंकरराव यादव यांचे रविवारी (१२ जुलै २०२६) हृदयविकाराच्या झटक्याने बुधवार पेठेतील घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या पत्नी व मोलकरीण संघटनेच्या राज्य अध्यक्षा कॉ. सुशीला यादव यांचे अवघ्या बारा दिवसांपूर्वीच निधन झाले होते. पत्नीच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशीच बाबासाहेब यादव यांचीही प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कामगार, शेतमजूर आणि असंघटित कामगार चळवळीतील एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब यादव यांनी शेतमजूर, सेवा सोसायटी आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. शुगर मिलमधील नोकरीचा त्याग करून त्यांनी पूर्णवेळ संघटनात्मक कार्य स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतमजूर, घरेलू कामगार संघटित झाले. कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटनेची स्थापना त्यांनी सर्वप्रथम कोल्हापुरात केली. कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत संघटनेचे संस्थापक, करवीर कामगार सेवा संघ अंतर्गत सोसायटीचे अध्यक्ष, करवीर ऑटो रिक्षा युनियनचे सेक्रेटरी, कोल्हापूर जिल्हा सहकार नोकर युनियनचे सेक्रेटरी, कोल्हापूर जिल्हा बेघर झोपडपट्टी संघटनेचे सेक्रेटरी, शुगर मिल कामगार संघटनेचे सेक्रेटरी यासह अनेक संस्थांचे ते पदाधिकारी होते. या संघटनांमध्ये ते अखेरपर्यंत कार्यरत होते.
पत्नी सुशीला यादव यांच्यासोबत त्यांनी घरेलू कामगार संघटनेची उभारणी, मोलकरणींसाठी कायदा, सामाजिक सुरक्षा, किमान वेतन, पेन्शन आणि कल्याणकारी योजनांसाठी सातत्याने आंदोलने केली. यादव दाम्पत्याने आयुष्यभर गरीब, असंघटित आणि वंचित कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लढा दिला. बाबासाहेब यादव यांच्यावर पंचगंगा विद्युत दाहिनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे संस्थापक मिलिंद यादव यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.